पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्यांकडून संपूर्ण गोव्यात इंधनाचा अखंडित पुरवठा सुनिश्चित


पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत लक्षणीय वाढ; नागरिकांना घाबरून खरेदी न करण्याचा सल्ला

Posted On: 25 MAY 2026 10:00PM by PIB Mumbai

पणजी, 25 मे 2026

सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल विपणन कंपन्या - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विविध राज्यांमध्ये इंधनाच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सुरळीत आणि अखंड उपलब्ध करण्याचे आश्वासन ग्राहकांना दिले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्या अखंडित इंधन पुरवठा आणि कार्यक्षम वितरण जाळे कायम राखण्यासाठी समन्वित कार्यवाही आणि वितरण व्यवस्थापन सुरू ठेवत आहेत.

अलीकडच्या काही दिवसांत, पेट्रोलियम उत्पादनांच्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. गोव्यामध्ये, गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत 1 मे ते 24 मे 2026 या कालावधीत पेट्रोलच्या किरकोळ विक्रीत 7.62% ची वाढ नोंदवली गेली आहे, तर डिझेलच्या किरकोळ विक्रीत 10.07% ची वाढ झाली आहे.

ही वाढीव मागणी प्रामुख्याने हंगामी कृषी उपक्रम आणि या प्रदेशातल्या इतर पुरवठादारांच्या तुलनेत असलेल्या किंमतीतल्या फरकामुळे संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचा सार्वजनिक क्षेत्रातल्या किरकोळ विक्री केंद्राकडे ओढा वाढल्याचे दिसून येत आहे.

देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्यांचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत, असे तेल उद्योगाने नागरिकांना सांगितले आहे. 

ग्राहकांना नेहमीप्रमाणे खरेदी सुरू ठेवण्याचा आणि घाबरून खरेदी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंधनाच्या उपलब्धतेबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी केवळ अधिकृत संस्था आणि तेल विपणन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिकृत संपर्कांवर/माहितीवरच विसंबून राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


 


(Release ID: 2265206) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English