नौवहन मंत्रालय
जेएनपीए कडून टर्मिनल्सवरील आयात कंटेनर प्रलंबितता कमी करण्यासाठी उपाययोजनांना गती
Posted On:
24 MAY 2026 1:05PM by PIB Mumbai
कंटेनर मालवाहतूक स्थानकांना सध्या जाणवणाऱ्या ट्रेलर चालकांच्या तात्पुरत्या टंचाईमुळे, टर्मिनल्सवरून स्थानकांकडे आयात कंटेनर्स वाहून नेण्याच्या प्रक्रियेवर विपरित परिणाम झाला आहे. बंदराचे कामकाज प्रभावित झाले नसले तरी, टर्मिनल यार्डमधील आयात मालाचा साठा वाढला आहे, त्यामुळे अतिरिक्त सुलभता उपायांची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी
जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने यापूर्वीच अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, त्यात ग्रीन चॅनेलद्वारे एकत्रित वाहनांच्या साहाय्याने स्थानकाकडे एकाच वेळी कंटेनर पाठवणे, रेल्वेद्वारे वाहतूक वाढवणे आणि व्यापार भागधारकांना वाढीव सहकार्य देणे समाविष्ट आहे. या उपायांमुळे आयात साठ्याची परिस्थिती स्थिर रहायला मदत झाली आहे; तथापि, प्रलंबितता सामान्य पातळीवर आणण्यासाठी पुढील पावले उचलणे आवश्यक आहे.
त्यानुसार, ज्या आयातदारांनी किंवा त्यांच्या अधिकृत एजंट्सनी पूर्वी कंटेनर मालवाहतूक स्थानक डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता आणि आता ते आयात यार्डमधून आपला माल थेट स्वीकारायला तयार आहेत, ते आपल्या 'प्रवेश बिलाचे 'थेट बंदर डिलिव्हरी' स्थितीमध्ये रूपांतर करण्यासाठी सीमाशुल्क विभागाकडे अर्ज करू शकतील.
या संदर्भात, सीमाशुल्क विभागाने प्राधान्यक्रमाने आवश्यक मंजुरी देण्याचे मान्य केले आहे. टर्मिनल्स आणि नौवहन मार्गिका सुद्धा ही रूपांतरण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि कंटेनर सोडण्यासाठी पूर्ण सहकार्य करतील.
आयातदारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना सल्ला देण्यात येतो की त्यांनी डिलिव्हरी ऑर्डरमध्ये सुधारणा करण्यासाठी संबंधित नौवहन मार्गिकांशी समन्वय साधावा आणि स्वतःच्या वाहनांचा वापर करून टर्मिनल्सवरून थेट कंटेनर वाहून नेण्याची व्यवस्था करावी.
टर्मिनल्सवरून अशा सर्व रूपांतरित कंटेनर्सच्या सुरळीत वाहतुकीसाठी जेनपीए मदत करेल. कोणतीही अडचण आल्यास, भागधारक डी.ए. गावडे, उपव्यवस्थापक (वाहतूक) यांच्याशी 9819030492 या क्रमांकावर संपर्क साधावा.
***
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2264744)
अभ्यागत कक्ष : 26