शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयएम नागपूरच्या १० व्या दीक्षांत समारंभात ४४३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान


संस्थेकडून पहिली एक्झिक्युटिव्ह पीएच.डी. पदवी प्रदान 

जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

Posted On: 23 MAY 2026 8:36PM by PIB Mumbai

 

नागपूर 22 मे 2026 

भारतीय प्रबंध संस्थान नागपूरचा १० व्या दीक्षांत समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला. यात एकूण ४४३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. व्यवस्थापन शिक्षण, एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य या आयआयएम नागपूरची होत असलेली सातत्यपूर्ण प्रगती या समारंभातून अधोरेखित झाली.
पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एमबीए २०२४-२६ बॅचचे ३४७ विद्यार्थी, नागपूर आणि पुणे येथील एक्झिक्युटिव्ह एमबीए अभ्यासक्रमांचे ९५ विद्यार्थी, तसेच एक एक्झिक्युटिव्ह पीएच.डी. संशोधक यांचा समावेश होता. या दीक्षांत समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे आयआयएम नागपूरने यंदा आपली पहिली एक्झिक्युटिव्ह पीएच.डी. (आचार्य) पदवी प्रदान केली. तसेच फ्रान्समधील दोन विद्यार्थ्यांनी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत ड्युअल डिग्री कार्यक्रम पूर्ण करून पदवी स्वीकारली.
जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष श्री. सज्जन जिंदल हे या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. सिग्मा कॅपिटल लिमिटेडचे अध्यक्ष श्री. देवेन जे. मेहता हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष श्री. सी. पी. गुरनानी, बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य आणि प्राध्यापकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते.
दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. सज्जन जिंदल म्हणाले की, महान नेतृत्व केवळ मोठ्या निर्णयांच्या बोर्डरूममध्ये घडत नाही, तर कमी जोखमीच्या, लहान बैठकींमध्ये, कोणाचेही लक्ष नसताना घेतलेल्या असंख्य निर्णयांतून ते आकार घेत असते. “बोर्डरूममध्ये सहज घेतल्यासारखे वाटत असले तरी अश्या महत्त्वाच्या निर्णयांच्या मागे अनेक वर्षांचा अनुभव, तपस्या, सराव आणि सुधारणां असतात,” असे ते म्हणाले.
आपल्या भाषणात श्री. जिंदल यांनी टेनिसपटू रॉजर फेडररच्या सहजसुंदर वाटणाऱ्या बॅकहँडचा संदर्भ देत जागतिक दर्जाच्या संस्था आणि व्यवसाय उभारणीशी त्याची तुलना केली. बाहेरून सहज, नैसर्गिक किंवा देखणे वाटणारे यश प्रत्यक्षात हजारो वेळा केलेल्या सरावाचे, सुधारणांचे आणि सातत्याने पाळलेल्या उच्च दर्जाचे परिणाम असते, असे त्यांनी सांगितले.
“जे सहज वाटते ते प्रत्यक्षात सहज नसते. त्यातील सौंदर्य खरे असते; पण त्यामागे वर्षानुवर्षे केलेला शिस्तबद्ध सराव असतो,” असे श्री. जिंदल म्हणाले. हाच सिद्धांत नेतृत्व, व्यवसाय आणि संस्था उभारणीस लागू होतो, असे त्यांनी नमूद केले.
भारताला शिस्त, उद्देश आणि कृतीशील दृष्टिकोन असलेल्या नेतृत्वाची गरज आहे, असे सांगून श्री. जिंदल यांनी २०२६ च्या पदवीधर विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, धैर्य आणि देशप्रेमाने नेतृत्व करण्याचे आवाहन केले. “भारताला केवळ भविष्य पाहू शकणाऱ्या लोकांची गरज नाही; भारताला ते भविष्य घडवू शकणाऱ्या लोकांची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
विशेष अतिथी श्री. देवेन जे. मेहता यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासात चार महत्त्वाचे यशमंत्र सोबत ठेवण्याचे आवाहन केले. “प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, विश्वास आणि धैर्य ही मूल्ये कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतात,” असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी आयुष्यात प्रगती करताना सकारात्मक आणि विनम्र राहावे, असेही त्यांनी सांगितले. “आयुष्यात मोठे व्हा आणि हसत राहा,” असे सांगत त्यांनी यशासोबत नम्रता आणि आनंदही महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.
भारताच्या विकासकथेचा उल्लेख करताना श्री. मेहता म्हणाले की, भारत हा तेजाने पुढे जाणारा देश असून देशातच मोठ्या संधी उपलब्ध आहेत. युवकांनी देशाच्या प्रगतीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. “भारताला अजून बरीच मजल मारायची आहे. या प्रगतीचा आणि विकासाचा तुम्ही सर्वांनी भाग बना,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यापूर्वी डॉ. सी. पी. गुरनानी यांनी स्वागतपर भाषण केले.
क्षणचित्रे 
•    आयआयएम नागपूरच्या पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये एमबीए २०२४-२६ बॅचचे ३४७ विद्यार्थी, नागपूर आणि पुणे येथील एक्झिक्युटिव्ह एमबीए कार्यक्रमांचे ९५ विद्यार्थी आणि एक एक्झिक्युटिव्ह पीएच.डी. संशोधक यांचा समावेश होता. एकूण पदवीधरांपैकी २८८ विद्यार्थी पुरुष आणि १५५ विद्यार्थी महिला होत्या.
•    यंदा आयआयएम नागपूरला सहा आंतरराष्ट्रीय ऑफर्स प्राप्त झाल्या. तसेच संस्थेने वार्षिक ७३.१७ लाख रुपयांचे सर्वोच्च पॅकेज नोंदवले. या प्लेसमेंट प्रक्रियेत आघाडीच्या २५० कंपन्यांचा सहभाग होत्या त्यात बहुराष्ट्रीय कंपन्या, प्रतिष्ठित भारतीय कंपन्या आणि प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सहभाग घेतला.
•    समारंभात शैक्षणिक कामगिरी, सर्वांगीण गुणवत्ता आणि विविध विशेष क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. 
•    प्रशांत गुप्ता यांना एमबीए अभ्यासक्रमातील सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर गोल्ड मेडल आणि रायसोनी एज्युकेशनच्या सहकार्याने दिला जाणारा ५ लाख रुपयांचा जी. एच. रायसोनी मेरिट अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
•    सोमानी शुभ यांना दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी जी. एच. रायसोनी गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले, तर शिवम चंद्र यांना सर्वांगीण कामगिरीसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.
•    एक्झिक्युटिव्ह एमबीए विभागात पुणे २०२३-२५ बॅचचे योगेश माधवराव वाधोणकर आणि अनुरूप अजमेरा यांना गुणवत्तेनुसार संयुक्तपणे शैक्षणिक कामगिरीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
•    नागपूर २०२३-२५ बॅचचे विष्णू कांत आणि पुणे २०२४-२६ बॅचच्या अंकिता यादव यांनाही त्यांच्या संबंधित बॅचमधील शैक्षणिक कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
•    आयआयएम नागपूरचा १० वा दीक्षांत समारंभ शैक्षणिक उत्कृष्टता, आंतरराष्ट्रीय सहकार्य, एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन, संशोधनवृद्धी आणि विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्सव ठरला. 
•    भारतात आणि जागतिक पातळीवर नेतृत्व विकासात योगदान देणारी तरुण आणि वेगाने प्रगती करणारी व्यवस्थापन संस्था म्हणून आयआयएम नागपूरची वाढती भूमिका या समारंभातून अधोरेखित झाली.

***

IIM NAGPUR/धनंजय वानखेडे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264648) अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein: English