वस्त्रोद्योग मंत्रालय
“जेनेसिस 2026”दीक्षांत सोहळ्यात एनआयएफटी मुंबईकडून सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचे प्रदर्शन
Posted On:
23 MAY 2026 2:43PM by PIB Mumbai
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी , मुंबईने आपल्या “जेनेसिस 2026” या दीक्षांत सोहळ्याचे आयोजन केले, ज्यात सहा पदवी आणि दोन पदव्युत्तर विभागांतील 413 हून अधिक पदवीधर विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी , सर्जनशीलता, नवोन्मेष आणि उद्योग क्षेत्रासाठी सज्जतेचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्रोद्योग आयुक्त वृंदा मनोहर देसाई यांच्या हस्ते झाले, ज्या प्रमुख पाहुण्या म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात औपचारिक उद्घाटन, दीपप्रज्वलन आणि एनआयएफटी मुंबईचे संचालक प्रा. डॉ. अजित कुमार खरे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. आपल्या भाषणात त्यांनी बदलत्या ग्राहक गरजांनुसार विद्यार्थ्यांना उद्योजकीय, अभिनव आणि तंत्रज्ञान-आधारित कौशल्यांनी सुसज्ज बनवण्याप्रति संस्थेची वचनबद्धता अधोरेखित केली.
‘एआयच्या युगात भारतीय वस्त्रोद्योगाचे भविष्य’ या विषयावरील परिसंवादादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना, प्रमुख पाहुण्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राचे भावी नेतृत्व बनण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी एनआयएफटीच्या उद्योग-केंद्रित शैक्षणिक दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या सहयोगी औद्योगिक प्रकल्पांसाठी व अभिनव समस्या-निवारण क्षमतेबद्दल त्यांची प्रशंसा केली. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी सर्जनशीलतेचा पर्याय न बनता एक साधन म्हणून वापरायला हवी, यावर भर देत, त्यांनी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त भारतीय ब्रँड्स तयार करताना भारताच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे संवर्धन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख पाहुण्यांनी भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्राची ताकद, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना आणि राष्ट्रीय फायबर उपक्रमांसारखे सरकारी उपक्रम, तसेच जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि पर्यावरणाप्रति जबाबदार वस्त्रोद्योग घडवण्यासाठी शाश्वतता, तांत्रिक वस्त्रे आणि चक्रीयता यांचे वाढते महत्त्व देखील अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे 'एआयच्या युगात भारतीय वस्त्रोद्योगाचे भविष्य' या विषयावरील परिसंवाद होता, जो परिसंवादाचे ज्ञान भागीदार असलेल्या सुविन एक्स्पो एलएलपीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या सत्रात वस्त्रोद्योग आणि फॅशन परिसंस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनात्मक भूमिकेवर चर्चा करण्यासाठी नामवंत उद्योगपती, शिक्षणतज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ एकत्र आले होते.
या परिसंवादाचे संचालन अविनाश मयेकर यांनी केले. प्रतिष्ठित पॅनेल सदस्यांमध्ये कपिल पाथरे, डॉ. जी. व्ही. आरस, डॉ. विजय गोटमारे आणि शालिग्राम यांचा समावेश होता.
या चर्चेत, कृत्रिम बुद्धिमत्ता वस्त्र उत्पादन, किरकोळ विक्री, पुरवठा साखळी व्यवस्थापन, गुणवत्ता तपासणी, शाश्वतता आणि फॅशन संबंधी अंदाज या क्षेत्रांमध्ये कसे परिवर्तन घडवत आहे हे अधोरेखित करण्यात आले. पॅनेल सदस्यांनी भविष्यसूचक विश्लेषण, उपलब्ध साठा आणि मागणी यात समतोल राखणे , स्वयंचलित दोष शोधन, स्मार्ट प्रोसेसिंग, डिजिटल ट्विन्स आणि शाश्वत उत्पादन पद्धतींमध्ये एआयच्या भूमिकेवर भर दिला. एआय मानवी सर्जनशीलतेची जागा घेणार नाही, परंतु जलद नवोन्मेष आणि सुधारित निर्णयक्षमतेसाठी डिझाइनर्स आणि उत्पादकांना प्रगत साधनांनी सक्षम करेल, याबाबत तज्ञांनी सहमती दर्शवली .
जेनेसिस 2026 चा एक भाग म्हणून, या पदवीदान सोहळ्याने पदवीधर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये अभिनव प्रकल्प आणि डिझाइन कलेक्शन सादर करण्यासाठी एक ऊर्जाशील व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
फॅशन डिझाइन विभागाने “फॅशनोव्हा 2026” प्रदर्शित केले, ज्यामध्ये टाटा ट्रेंड, बीबा, स्केचर्स आणि मिन्त्रा यांसारख्या कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केलेले उद्योग-संबंधित कलेक्शन होते. यामध्ये शाश्वतता, पारंपरिक वस्त्रे आणि अपारंपरिक वस्त्रे यावर भर देण्यात आला होता.
टेक्सटाईल डिझाइन विभागाने “तंतू 2026” सादर केले, ज्यामध्ये अरविंद, रेमंड, जयपूर रग्स, अबू जानी, संदीप खोसला आणि ईका यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने वस्त्रे, गृहसजावट, ब्रँडिंग आणि शाश्वत वस्त्र पद्धती यांमधील प्रकल्पांचा समावेश होता.
ॲक्सेसरी डिझाइन विभागाने “TAOCEAN 2026” चे आयोजन केले ज्यात टायटन, बोट, ब्लूस्टोन, टाटा पॉवर आणि आदिदास यांसारख्या सहकाऱ्यांसोबत दागिने, पादत्राणे, फर्निचर, UI/UX आणि एक्सपीरिअनशील डिझाइनमधील प्रकल्प प्रदर्शित करण्यात आले.
मास्टर ऑफ डिझाइन स्पेस विभागाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड आणि लोकस डिझाइन यांच्या सहकार्याने सर्व्हिस डिझाइन, सस्टेनेबिलिटी आणि ब्रँड स्ट्रॅटेजीमधील आंतरविद्याशाखीय प्रकल्पांसह “D.Dots 2026” चे सादरीकरण केले.
बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी विभागाने GUESS, रिलायन्स ब्रँड्स आणि सिडनी अपेरल एलएलसी यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने “टेक्नोव्हा 2026 ” सादर केले, ज्यामध्ये स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेस ऑप्टिमायझेशन आणि समावेशक डिझाइनमधील प्रकल्पांचा समावेश होता.
फॅशन कम्युनिकेशन विभागाने रिलायन्स रिटेल, प्यूमा, टाटा क्लीक, गोझूप ग्रुप आणि डीडीबी मुद्रा यांच्या सहकार्याने “कम्युनिक 2026” आयोजित केले, ज्यामध्ये ब्रँडिंग, एआय-निर्मित चित्रपट निर्मिती, डिजिटल स्टोरीटेलिंग आणि ई-कॉमर्समधील प्रकल्प समाविष्ट होते.
निटवेअर डिझाइन विभागाने गोकळदास एक्सपोर्ट्स आणि शाही एक्सपोर्ट्स प्रा. लि. यांच्या सहयोगाने “निटमोडा 2026” आयोजित केले, ज्यामध्ये महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, ॲक्टिव्हवेअर आणि स्ट्रीटवेअर कलेक्शन प्रदर्शित करण्यात आले.
फॅशन मॅनेजमेंट स्टडीज विभागाने “द बॉटमलाइन” हा उद्योग-केंद्रित शैक्षणिक शोकेस प्रदर्शित केला, ज्यामध्ये ई-कॉमर्स, रिटेल, सप्लाय चेन मॅनेजमेंट, लक्झरी फॅशन आणि फॅशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश होता. मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट प्रोग्रामच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी Zouk, Aza Fashions, Pantaloons, Flipkart, Zudio आणि Westside यांसारख्या आघाडीच्या संस्थांशी सहकार्य केले.
फॅशन डिझाइन आणि निटवेअर डिझाइन विभागांमधील पदवीधर विद्यार्थ्यांच्या फायनल कलेक्शनचे प्रदर्शन करणाऱ्या एका शानदार ग्रॅज्युएशन फॅशन शोने या सोहळ्याची सांगता झाली. या रनवेवर कूटूर, अवंत-गार्डे आणि प्रेट-ए-पोर्टर या श्रेणींमधील कलेक्शन सादर करण्यात आले. यामध्ये शाश्वतता, वारसा वस्त्रे आणि पारंपरिक हस्तकला यांसारख्या संकल्पना मांडण्यात आल्या, तसेच वूल फेल्टिंग, नवीन फायबरसह विणकाम, फोटोल्युमिनेसेंट फॅब्रिक्स आणि संगणकीकृत हँड फ्लॅट निटिंग यांसारख्या अभिनव तंत्रांचा प्रयोगही करण्यात आला.
“जेनेसिस 2026 ” या दीक्षांत सोहळा 2026 च्या पदवीधर तुकडीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला , ज्यात एनआयएफटी मुंबईमधील त्यांचा शैक्षणिक प्रवास आणि सर्जनशील कामगिरी यशस्वीरित्या साजरी करण्यात आली. “जेनेसिस 2026 ” च्या माध्यमातून, एनआयएफटी मुंबईने सर्जनशील उत्कृष्टतेला प्रोत्साहन , नवोन्मेषाला चालना , उद्योग सहकार्य मजबूत करणे आणि वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक फॅशन व वस्त्रोद्योग परिसंस्थेचे नेतृत्व करण्यासाठी भावी व्यावसायिकांना तयार करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.





***
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2264494)
अभ्यागत कक्ष : 20