अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर कायदा, 2025 विषयी “प्रारंभ–2026" या जनजागृती कार्यक्रमाचे कौटिल्य भवन, मुंबई येथे आयोजन


नवीन प्राप्तीकर कायदा 2025 अंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्य निर्धारण या सत्रात व्यापार आणि उद्योगातील हितधारकांचा सहभाग

Posted On: 22 MAY 2026 9:20PM by PIB Mumbai

मुंबई, 22 मे 2026

 

नवीन प्राप्तीकर कायदा, 2025 आणि  'प्राप्तिकर नियम, 2026' वर आधारित “प्रारंभ– 2026” या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज प्राप्तीकर विभाग, सीसीआयटी (आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्य), पश्चिम विभाग, मुंबई च्या वतीने करण्यात आले होते. “सीमा जोडणे , विश्वास निर्माण करणे” या संकल्पनेअंतर्गत हे आयोजन करण्यात आले. या जनजागृती उपक्रमाचा उद्देश नवीन 'प्राप्तिकर कायदा, 2025' आणि 'प्राप्तिकर नियम, 2026' च्या तरतुदींबद्दल, विशेषतः आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्य निर्धारण (ट्रान्सफर प्राइसिंग) याबाबत  जागरूकता निर्माण करणे आणि हितधारकांना माहिती देणे हा होता.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य (कायदेनिर्मिती) प्रसेनजीत सिंग प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. नवी दिल्ली येथील प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय कर आकारणी) मोनिका भाटिया या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. मुंबई पश्चिम विभागाचे मुख्य प्राप्तीकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय कर आकारणी) मोहित जैन यांनी स्वागतपर भाषण केले. प्राप्तीकर कायदा, 2025 मध्ये नमूद महत्त्वपूर्ण कायदेशीर सुधारणाबाबत  प्रमुख हितधारकांशी अर्थपूर्ण आणि थेट संवाद साधण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेवर त्यांनी भाषणात भर दिला.

आपल्या भाषणात, प्रसेनजीत सिंग यांनी अधोरेखित केले  की, प्राप्तीकर कायदा, 2025 हा एक सुलभ, प्रगतिशील आणि करदाते स्नेही कायदा आहे, ज्याचा उद्देश विकसित होत असलेल्या कर प्रशासन प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवणे, गुंतागुंत कमी करणे आणि अनुपालन सुलभता वाढवणे हा आहे. नवीन कायदेशीर चौकटीत सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी विभाग आणि हितधारकांमध्ये सक्रिय सहभाग आवश्यक असल्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

मोनिका भाटिया यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात, नवीन कायद्यातील आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्य निर्धारण तरतुदींच्या महत्त्वाकडे लक्ष वेधले आणि प्रभावी अनुपालनासाठी हितधारकांना विभागासोबत भरीव संवाद साधण्यास प्रोत्साहित केले. यानंतर, प्राप्तीकर कायदा, 2025 वर एक छोटे व्हिडीओ सादरीकरण करण्यात आले, ज्याद्वारे सहभागींना नवीन कर चौकटीअंतर्गत मांडलेल्या  प्रमुख कायदेशीर आणि नियामक बाबींची ओळख करून देण्यात आली.

विभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने “नवीन प्राप्तीकर कायदा 2025 आणि नवीन प्राप्तीकर कर नियम, 2026 यांचा उदय - आंतरराष्ट्रीय कररचना आणि हस्तांतरण मूल्य निर्धारण यावर  विशेष लक्ष” या विषयावरील आंतरसंवादात्मक तांत्रिक सत्र घेण्यात आले. या सत्रात प्राप्तीकर  कायदा, 1961 च्या तुलनात्मक आढाव्यासह नवीन कायदा आणि नियमांतील तरतुदीविषयी तपशीलवार माहिती देण्यात आल्यामुळे सहभागींना या स्थित्यंतराचा आवाका आणि परिणामांचे आकलन शक्य झाले.

या कार्यक्रमात नवीन प्राप्तीकर कायदा 2025 आणि नवीन प्राप्तीकर  नियम, 2026 यांच्या संदर्भात करदात्यांना असलेल्या चिंतांविषयी आंतरसंवादात्मक गटचर्चा देखील आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर भागधारकांसह एक सर्वसमावेशक प्रश्नोत्तरे आणि ओपन हाऊस सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रामध्ये सहभागी झालेल्यांनी नव्या आयकर कायद्यातील तरतुदी आणि नव्या/विलीन झालेल्या अर्जांशी आणि प्राप्तीकर  नियम 2026 मधील नियमांशी संबंधित समस्या, प्राप्तीकर  कायदा 1961 कडून प्राप्तीकर  कायदा 2025 कडे होणाऱ्या स्थित्यंतरातील तरतुदी तसेच आंतरराष्ट्रीय कररचना आणि हस्तांतरण मूल्याशी संबंधित तरतुदी यांच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले आणि अधिक माहितीही विचारली. विभागातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.

या कार्यक्रमात प्राप्तीकर विभागाने नव्याने सुरु केलेल्या ‘कर साथी’ या कृत्रिम बुद्धीमत्तेने चलित सक्षम चॅटबॉटचे सादरीकरण देखील करण्यात आले. करदात्यांना करांशी संबंधित शंकांबाबत वास्तविक वेळी मार्गदर्शन आणि मदत देण्याच्या उद्देशाने या चॅटबॉटची रचना करण्यात आली असून सादरीकरणाचे सहभागींनी अत्यंत उत्सुकतेने स्वागत केले.

या कार्यक्रमात करदात्यांचे शिक्षण आणि भागधारकांचा सहभाग यांच्या बाबतीत माहितीपूर्ण, व्यावहारिक तसेच आंतरसंवादात्मक दृष्टीकोन स्वीकारल्याबद्दल व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सहभागींकडून या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा करण्यात आली. 

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/संजना चिटणी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264406) अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein: English