पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
गोव्यातील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा अखंड पुरवठा केला सुनिश्चित
Posted On:
22 MAY 2026 8:25PM by PIB Mumbai
गोवा, 22 मे 2026
गोव्यासह अनेक प्रदेशांमध्ये इंधनाच्या मागणीत झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (एम एस), डिझेल (एच एस डी) आणि एलपीजीची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी देशभरात समन्वित कामकाज आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापन सुरू ठेवले आहे.
आकडेवारीनुसार, 1 ते 21 मे 2026 या कालावधीत गोव्यात डिझेलच्या किरकोळ विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. राज्यात गेल्या वर्षी याच कालावधीतील 16,353 किलोलीटर तुलनेत 18,697 किलोलीटर हाय-स्पीड डिझेलचा (एचएसडी) वापर नोंदवला गेला, जी 14.3 टक्क्यांची वाढ दर्शवते.
इंधनाच्या मागणीतील वाढीमागे अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये ग्रामीण कृषी भागातील हंगामी नांगरणी आणि कापणीच्या कामांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पुरवठादारांकडील किंमतींच्या फरकामुळे ग्राहक सार्वजनिक क्षेत्रातील किरकोळ विक्री केंद्रांकडे वळले आहेत. संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचे किरकोळ इंधन विक्री केंद्रांकडे झालेले स्थलांतरदेखील या वाढीव मागणीस कारणीभूत ठरले आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या टर्मिनल, डेपो, पाइपलाइन, एलपीजी बॉटलिंग प्लांट आणि किरकोळ विक्री केंद्रे यांचा समावेश असलेल्या आपल्या विस्तृत देशव्यापी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून इंधनाचा अखंड पुरवठा कायम ठेवत आहेत. बाजारपेठांमध्ये पेट्रोलियम उत्पादनांची सुरळीत वाहतूक आणि वेळेवर पुनर्भरण सुनिश्चित करण्यासाठी पुरवठा पथके, वाहतूक जाळे, टर्मिनल कामकाज आणि निवडक किरकोळ विक्री केंद्रे अहोरात्र कार्यरत आहेत.
इंधनाचे वितरण सुरळीत आणि कार्यक्षम होण्यासाठी तेल कंपन्या राज्य प्रशासनांसोबत निकट समन्वय राखून काम करत आहेत.
तेल उद्योगाने ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
नागरिकांना नेहमीप्रमाणे खरेदी सुरू ठेवण्याचा आणि घाबरून खरेदी करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंधन उपलब्धतेबाबतच्या अचूक माहितीसाठी केवळ अधिकृत संस्था आणि तेल विपणन कंपन्यांनी जारी केलेल्या अधिकृत सूचनांवरच अवलंबून राहण्याचे आवाहनही ग्राहकांना करण्यात आले आहे.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2264400)
अभ्यागत कक्ष : 10