इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांची मुंबई क्षेत्रीय कार्यालयाला भेट, डिजिटल नवोन्मेष आणि नागरिक-केंद्रीत सेवा वितरणाचा केला पुनरुच्चार

Posted On: 22 MAY 2026 7:48PM by PIB Mumbai

मुंबई, 22 मे 2026

 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (युआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ विजय यांनी या पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांच्या क्षेत्रीय पोहोच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मुंबईच्या युआयडीएआय क्षेत्रीय कार्यालयाला भेट दिली.

मुंबईच्या युआयडीएआय आरओ कार्यालयाचे उपमहासंचालक (डीडीजी) कॅप्टन लौकेश ठाकूर यांनी कर्नल अक्षय यादव आणि लेफ्टनंट कर्नल ध्रुव या ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह सौरभ विजय यांचे स्वागत केले. या भेटीदरम्यान विजय यांनी क्षेत्रीय कार्यालयातील चमूशी तपशीलवार चर्चा केली आणि क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज, कामगिरी तसेच कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी मुंबईच्या युआयडीएआय क्षेत्रीय कार्यालयाचे परिचालनसंबंधी यश, क्षेत्र-स्तरावरील उपक्रम तसेच भविष्यकालीन आराखडा यांची अधिक माहिती देणारे व्यापक सादरीकरण सीईओ सौरभ विजय यांच्यासमोर सादर करण्यात आले. यावेळी घेतलेल्या आढाव्यात आधारविषयक सेवा वितरण मजबूत करणे तसेच महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या भागांतील रहिवाशांमध्ये डिजिटल सेवांच्या स्वीकाराला गती देणे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.

यावेळी बोलताना देशभरात निर्धोक, सुरळीत आणि नागरिक-केंद्री ओळखसंबंधी सेवा देण्याप्रती युआयडीएआयच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेवर सौरभ विजय यांनी अधिक भर दिला. परिचालनात्मक कार्यक्षमता आणि माहितीचे संरक्षण यांचा दर्जा उत्तम राखतानाच रहिवाशांना अधिक सुधारित अनुभव देण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा सक्रियपणे वापर करून घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले. कॅप्टन लौकेश ठाकूर यांनी यावेळी बोलताना विश्वसनीय डिजिटल ओळखविषयक सेवांच्या माध्यमातून रहिवाशांना सक्षम करण्याच्या युआयडीएआयच्या मोहिमेला आणखी पुढे नेण्यासाठी मुंबईच्या युआयडीएआय क्षेत्रीय कार्यालयाच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.

या भेटीतून क्षेत्रीय कार्यालयांशी असलेला समन्वय अधिक दृढ करण्यासाठी आणि स्वतःच्या समावेशक, विश्वासार्ह तसेच भविष्यासाठी सज्ज असलेल्या डिजिटल ओळखसंबंधी सेवांच्या संकल्पनेशी क्षेत्रीय कार्यालयाना जोडून  घेण्यासाठी युआयडीएआय करत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे दर्शन घडते.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/संजना चिटणी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2264393) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English