नौवहन मंत्रालय
मुरगाव बंदर प्राधिकरणाने भागधारकांचा केला सन्मान
भारतातील प्रमुख बंदरांमध्ये सर्वाधिक मालवाहतूक वाढीची नोंद
एमपीए उत्कृष्टता पुरस्कार 2026 सोहळा उत्साहात संपन्न
Posted On:
22 MAY 2026 9:21PM by PIB Mumbai
गोवा, 22 मे 2026
मुरगाव बंदर प्राधिकरणाने 22 मे 2026 रोजी गोव्यातील पणजी येथे ‘एमपीए भागधारक पुरस्कार सोहळा 2026’ आयोजित केला होता. यावेळी 2025-26 या आर्थिक वर्षात बंदराच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये ज्यांचे योगदान महत्वाचे ठरले, अशा भागधारकांना सन्मानित करण्यात आले.
हुबळी येथील दक्षिण पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बेला मीना या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गोव्याचा सागरी व्यापार आणि आर्थिक विकासाला बळकट करण्यासाठी बंदर समुदायाने केलेल्या सामूहिक प्रयत्नांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली. सन्माननीय अतिथी, गोव्याचे सीमाशुल्क आयुक्त बिपीन कुमार उपाध्याय यांनी भारतातील प्रमुख बंदरांमध्ये सर्वाधिक वाढ साध्य केल्याबद्दल एमपीए आणि त्याच्या भागधारकांचे अभिनंदन केले, तसेच सागरी क्षेत्र मजबूत करण्यासाठी सहकार्य, कार्यक्षमता आणि शाश्वत विकासाच्या महत्त्वावर भर दिला.
OOXQ.jpeg)
कार्यक्रमाला संबोधित करताना, एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांनी आर्थिक वर्ष 2025-26 मधील मुरगाव बंदराच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला. या कालावधीत बंदराने 16 टक्के मालवाहतूक वाढ नोंदवली असून, भारतातील सर्व प्रमुख बंदरांमध्ये ती सर्वाधिक आहे, तर 21.01 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) मालाची हाताळणी केली असून, ती गेल्या पाच वर्षांतली या बंदराची सर्वाधिक माल हाताळणी आहे.
मालवाहतुकीची वाढ, परिचालन कार्यक्षमता आणि बंदर परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी दिलेल्या असाधारण योगदानाची दखल घेऊन, विविध श्रेणींमधील संबंधित घटकांना ‘उत्कृष्टता पुरस्कार’ प्रदान करण्यात आले, हा या कार्यक्रमाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग ठरला.
विनायक राव यांनी बंदराची कामगिरी, आधुनिकीकरण उपक्रम, परिचालन सुधारणा आणि भविष्यातील विकास योजना यावर सविस्तर सादरीकरण केले.

आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान मुरगाव बंदराने विविध मालवाहतूक विभागांमध्ये भक्कम वाढ नोंदवली. 'ड्राय बल्क' मालवाहतुकीमध्ये 16.73 टक्के, 'इतर संकीर्ण मालवाहतुकी'मध्ये 34.56 टक्के तर 'प्रक्रिया केलेल्या खत' वाहतुकीमध्ये 20.92 टक्के वाढ झाली. पेलेट्सचा समावेश असलेले 'लोहखनिज' आणि 'द्रवरूप मालवाहतुकीमध्येही सातत्यपूर्ण वाढ दिसून आली.
बंदराने परिचालन कार्यक्षमतेतही लक्षणीय सुधारणा नोंदवली. सरासरी टर्नअराउंड वेळ 69.68 तासांवरून 5 टक्के कमी होऊन 66.25 तासांवर आला, तर सरासरी शिप बर्थडे उत्पादन 16,081 मेट्रिक टनांवरून 20,289 मेट्रिक टनांपर्यंत म्हणजेच 26 टक्क्यांनी वाढले. हाताळल्या गेलेल्या रेल्वे रेक्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
आपल्या कार्यात्मक यशाप्रमाणेच बंदराने गेल्या पाच वर्षांत सर्वोत्तम आर्थिक कामगिरी साधली असून आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान ₹593 कोटींचे परिचालन उत्पन्न नोंदवले आहे. परिचालन अधिशेष आर्थिक वर्ष 2024-25 मधील ₹240.77 कोटींवरून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये ₹285.52 कोटींपर्यंत 18.6 टक्क्यांनी वाढला आहे.

आर्थिक वर्षात अनेक प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यात आले, ज्यामध्ये 3 MWp सौर ऊर्जा प्रकल्पाचे कार्यान्वयन, रेल्वे मार्ग क्रमांक 8 आणि 8A ची सुधारणा, बर्थ क्रमांक 8 वर नवीन अग्निशमन प्रणालीची स्थापना, पुनर्वापर केलेल्या पाण्याच्या पाइपलाइन टाकणे, PPP पद्धतीने बर्थ 5 आणि 6 वर आच्छादित शेडचे बांधकाम, PPP पद्धतीने बर्थ 10 आणि 11 चे संचालन आणि देखभाल, आणि RFID गेट ऑटोमेशनची अंमलबजावणी यांचा समावेश आहे.
या समारंभात वरिष्ठ सरकारी अधिकारी, व्यापार प्रतिनिधी, जहाजबांधणी क्षेत्रातील हितधारक, निर्यातदार, आयातदार, लॉजिस्टिक्स ऑपरेटर आणि सागरी क्षेत्रातील सदस्यांचा सहभाग होता.

XA1H.jpeg)
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/संजना चिटणी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2264387)
अभ्यागत कक्ष : 12