कृषी मंत्रालय
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) तसंच केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था (CCARI) - द्वारे भागधारकांशी सल्लामसलत आणि शेतकरी संवाद: 'शेतीद्वारे विकसित गोवा' यावर लक्ष्य केंद्रित
संशोधन सल्लागार समिती (RAC) सदस्यांची प्रगतशील शेतकऱ्याच्या एकात्मिक शेती मॉडेलला भेट; भागधारकांच्या चर्चेत, 'हवामान-अनुकूल शेती'वर भर
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2026 8:00PM by PIB Mumbai
गोवा, 21 मे 2026
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) तसंच केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्थेने, 19 मे 2026 रोजी, 10व्या संशोधन सल्लागार समितीच्या (RAC) तिसऱ्या बैठकीचा एक भाग म्हणून, गोव्यातील वाळपोई आणि सांकलीम इथे, भागधारकांचे चर्चासत्र आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी भेटीचं आयोजन केलं होत. या बैठकीत शाश्वत शेती, एकात्मिक शेती पद्धती, हवामानाची अनुकूलता आणि शेतकरी केंद्रित नवोन्मेषांवर विशेष भर देण्यात आला.
RAC चे अध्यक्ष डॉ. एस. डी. सावंत तसंच RAC चे सदस्य डॉ. एस. वेनिला, डॉ. व्ही. सेज्जन आणि डॉ. मनोज पी. सॅम्युएल यांनी, उत्तर गोव्यातील सत्तारी तालुक्यातील वाळपोई येथील प्रगतीशील शेतकरी विनोद बर्वे यांच्या शेताला भेट दिली. या भेटीदरम्यान, डॉ. प्रवीण कुमार, डॉ. शिरीष नरनावरे आणि संस्थेतील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते.
विनोद बर्वे हे, 'जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार' आणि 'लक्षाधीश शेतकरी पुरस्कार 2024' चे मानकरी आहेत. त्यांनी काजू प्रक्रियेत नावीन्य आणत, कृषी उत्पादनाचं मूल्यवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतीच्या माध्यमातून शेतीचं यशस्वी 'एकात्मिक शेती प्रारूप' विकसित केलं आहे. शेती फायदेशीर आणि शाश्वत होण्यासाठी, शेतीमध्ये केलेले विविध प्रयोग आणि त्यातून शेती उत्पादनांची साधलेली मूल्यवृद्धी, यासाठी बर्वे यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टीकोनाची RAC च्या सदस्यांनी प्रशंसा केली.
या भेटीदरम्यान, तज्ज्ञांनी, पुष्पशेती आणि भूदृश्य रचना अर्थात लँडस्केपिंग, लवकर आणि पुष्कळ पुष्पधारणा होणाऱ्या फणसांच्या जातीचा शोध, काजू पिकाची उत्पादकता आणि नफा आणखी वाढण्यासाठी काजूच्या बागांमध्ये सिंचन सुविधांची तरतूद करण्याबाबत काही बाबी सुचवल्या.
या भेटी नंतर,ICAR-CCARI तर्फे, गोव्यातील सांकलीम इथल्या, 'साई नर्सिंग इन्स्टिट्यूट'मध्ये सहभागीसाठी एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला, समाजसेविका आणि कार्यकर्त्या सुलक्षणा सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
शेतकऱ्यापर्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध संस्था आणि विभागमध्ये समन्वित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं सावंत यांनी यावेळी बोलताना नमूद केलं. त्याचप्रमाणे, तसेच, 'विकसित गोवा' आणि 'विकसित भारत' ही संकल्पना साकार करताना, खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब, 'जीआय' टॅगिंग आणि कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये युवकांचा वाढता सहभाग या बाबींचं महत्त्व त्यांनी विषद केलं.
हवामानातील बदल तसंच किनारी प्रदेशातील कृषी उत्पादनांमध्ये होत असलेली घट या समस्यांवर मात करण्यासाठी, हवामानाला अनुकूल असे वाण विकसित करणे, शेतीतील यांत्रिकीकरणात सुधारणा घडवून आणणे, मूल्यवर्धनाला प्रोत्साहन आणि पिकांच्या कापणीनंतर त्यांचं व्यवस्थापन अधिक चांगलं करणे या बाबींची आवश्यकता असण्यावर RAC च्या सदस्यांनी भर दिला.
या कार्यक्रमात शेतकरी, स्वयं सहायता गट, शेतकरी उत्पादक संस्था, शास्त्रज्ञ, कृषी, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागांचे अधिकारी, तसेच नाबार्ड, गोवा चेम्बर ऑफ कॉमर्स अंड इंडस्ट्रीज (GCCI), गोवा राज्य जैवविविधता मंडळ आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रतिनिधी असे एकंदर 80 भागधारक सहभागी झाले होते.



* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सविता म्हस्कर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(रिलीज़ आईडी: 2263916)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English