पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे इंधनाचा विनाव्यत्यय पुरवठा सुनिश्चित


तेल कंपन्यांनी ग्राहकांना नेहमीप्रमाणे खरेदी सुरू ठेवण्याचे आणि घाबरून अनावश्यक खरेदी टाळण्याचे आवाहन केले

Posted On: 21 MAY 2026 7:08PM by PIB Mumbai

मुंबई, 21 मे 2026

 

अनेक भागांमध्ये इंधनाच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांद्वारे देशभरात कामकाज आणि लॉजिस्टिक्स समन्वय राखला जात आहे.

महाराष्ट्र राज्यस्तरीय समन्वयक (तेल उद्योग) मिहीर गणेश जोशी यांच्या मते, गेल्या काही दिवसांमध्ये विविध जिल्ह्यांमधील हंगामी शेती विषयक कामांमुळे पेट्रोलियम उत्पादनांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. इतर पुरवठादारांच्या तुलनेत कमी किमतींमुळे किरकोळ ग्राहक सार्वजनिक क्षेत्रातील किरकोळ विक्री केंद्रांकडे वळल्यामुळे तसेच संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकही किरकोळ इंधन विक्री केंद्रांकडे  वळवल्याने अतिरिक्त मागणीचा दबाव निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील  सार्वजनिक क्षेत्रातील तिन्ही तेल कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांवर डिझेल आणि पेट्रोलच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलची ही वाढलेली मागणी तिन्ही  तेल कंपन्यांनी पूर्ण केली आहे.

मे  2026 च्या पहिल्या पंधरवड्यात डिझेल विक्रीत 19.66% आणि पेट्रोल विक्रीत  20.39% वाढ नोंदवली गेली. मे 2026  च्या पहिल्या पंधरवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 267 टीकेएल पेट्रोल आणि 502 टीकेएल डिझेलचा पुरवठा करण्यात आला. मे 2026 च्या तिसऱ्या आठवड्यातही वाढीचा हा चढता कल कायम राहिला असून, 18, 19 आणि 20 मे रोजी पेट्रोल विक्रीत अनुक्रमे 34%, 21% आणि 18% वाढ नोंदली गेली, तर याच कालावधीत डिझेल विक्रीत 49%, 42% आणि 40% वाढ नोंदली गेली.

मागणीत मोठी वाढ होऊनही, पुरवठा अखंडित राहिला आहे आणि सर्व गरजा पूर्णपणे भागविण्यात आल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या त्यांच्या टर्मिनल्स, डेपो, पाइपलाइन्स, एलपीजी बॉटलिंग प्लांट्स आणि किरकोळ विक्री केंद्रांच्या  देशव्यापी नेटवर्कद्वारे अखंडित पुरवठा कायम ठेवत आहेत. पुरवठा पथके, वाहतूक नेटवर्क, टर्मिनल ऑपरेशन्स आणि निवडक किरकोळ विक्री केंद्र बाजारात उत्पादनांची अखंडित वाहतूक आणि वेळेवर पुनर्भरण सुनिश्चित करण्यासाठी  24x7 कार्यरत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंधनाचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य प्रशासनासोबतही निकट समन्वय साधत आहेत.

तेल उद्योगाने ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुरवठा सुरळीत आणि अखंडित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या साठ्याच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत आणि वाढलेली मागणी कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी वाहतूक व वितरण नियोजनामध्ये जवळून समन्वय साधत आहेत. नागरिकांना नेहमीप्रमाणे खरेदी सुरू ठेवण्याचा आणि घाबरून अनावश्यक खरेदी टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.  इंधनाच्या उपलब्धतेबाबत अचूक आणि सत्यापित माहितीसाठी केवळ कंपन्या अथवा सरकारी प्राधिकरणांनी जारी केलेल्या अधिकृत महितीवरच नागरिकांनी विश्वास ठेवावा अशी विनंतीही  करण्यात येत आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2263908) अभ्यागत कक्ष : 37
Read this releasein: English