अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

भारताने प्रादेशिक सहकार्य कराराचे अध्यक्षपद स्वीकारले, नवी मुंबईत राष्ट्रीय प्रतिनिधींच्या 48व्या बैठकीला सुरुवात

Posted On: 20 MAY 2026 5:02PM by PIB Mumbai

 

मुंबई, 20 मे 2026

  • भारताने वर्ष 2026 साठीच्या प्रादेशिक सहकार्य कराराचे अध्यक्षपद स्वीकारले.
  • राष्ट्रीय प्रतिनिधींच्या 48 व्या बैठकीला नवी मुंबईत सुरुवात
  • या बैठकीत आफ्रिकन प्रादेशिक सहकारी करार शिष्टमंडळाचा भाग म्हणून 17 आशिया-प्रशांत देशांमधील 29 आणि आफ्रिकी देशांमधील 3 प्रतिनिधींचा समावेश
  • प्रादेशिक सहकार्य करार अणुविज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा शाश्वत विकासासाठी केल्या जाणाऱ्या शांततापूर्ण वापराला प्रोत्साहन देते.
  • अणुऊर्जा विभागाने विश्व बंधु भारत या भावनेअंतर्गत प्रादेशिक सहकार्य कराराप्रती भारताची वचनबद्धता केली अधोरेखित

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या प्रादेशिक सहकार कराराअंतर्गत राष्ट्रीय प्रतिनिधींच्या 48व्या बैठकीला 19 मे 2026 रोजी महाराष्ट्रात नवी मुंबई येथे आरंभ झाला. 19 ते 22 मे 2026 दरम्यान सुरु असणारी ही बैठक केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागाने आयोजित केली आहे.

या बैठकीच्या उद्घाटनपर सत्राला आशिया प्रशांत क्षेत्रातील 17 सदस्य देशांचे राष्ट्रीय प्रतिनिधी, तज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आणि प्रादेशिक सहकार्य करार कार्यालयातील प्रतिनिधी आणि आफ्रिकन प्रादेशिक सहकार करारातील तीन विशेष निमंत्रित उपस्थित होते.

भारताने कार्यवाहीचा भाग म्हणून वर्ष 2026 साठीच्या प्रादेशिक सहकार कराराचे अध्यक्षपद औपचारिकरीत्या स्वीकारले. अणुविज्ञान आणि तत्रंज्ञानाचा वापर शांततापूर्ण पद्धतीने करण्याच्या भारताच्या प्रादेशिक सहकारासोबतच्या दीर्घकालीन संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो.

यावेळी बोलताना भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन यांनी सामाजिक आणि औद्योगिक विकासात अणुऊर्जेचा शांततामय पद्धतीने वापर करण्याच्या भारताच्या दीर्घकालीन आणि निर्दोष कामगिरीवर भर दिला. तसेच आरोग्यसेवा, अन्न परिरक्षण, कृषी, किरणोत्सर्ग तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या राष्ट्रउभारणी करणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे उल्लेखनीय योगदान अधोरेखित केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून सामायिक विकासात्मक आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रादेशिक सहकार्याच्या महत्त्वावर अणुऊर्जा विभागाच्या अणु नियंत्रण आणि  नियोजन विभागाचे प्रमुख राजीव केसवानी यांनी भर दिला. भारत प्रादेशिक सहकार कराराअंतर्गत राष्ट्रीय प्रतिनिधींच्या 48व्या बैठकीचे यजमानपद भूषवत असून यातून आशिया आणि प्रशांत क्षेत्रात भागीदारी आधारित शास्त्रीय सहकार्याबद्दलची भारताची अतूट बांधिलकी दिसून येते, असे ते म्हणाले. 

भारताचे प्रादेशिक सहकारी करार प्रतिनिधी, पुष्पेंद्र कुमार शर्मा यांनी या बैठकीचा अजेंडा आणि कार्यवाही याबाबत माहिती दिली यामध्ये राष्ट्रीय प्रादेशिक सहकारी कराराच्या अंमलबजावणीसाठी झालेला विचारविनिमय, भविष्यातील प्रकल्पांचा विकास, प्रादेशिक सहकार्य आराखडा, प्रादेशिक सहकार करार क्षेत्रीय कार्यालयातील उपक्रम आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या 70व्या सर्वसाधारण बैठकीत निश्चित केलेल्या इतर उपक्रमांचा समावेश होता.

राष्ट्रीय संपर्क अधिकारी संपतकुमार रघुनाथन यांनी आरसीएचे संस्थापक सदस्य म्हणून भारताच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे प्रास्ताविक केले. तसेच त्यांनी प्रतिनिधींचे स्वागत करताना भारताच्या पारंपरिक आदरातिथ्य भावनेचे प्रतीक असलेल्या “अतिथी देवो भव” या मूल्याचा उल्लेख केला आणि सर्व सहभागी देश आणि प्रतिनिधींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

भारताकडे प्रादेशिक सहकार करार मंचाचे अध्यक्षपद

राष्ट्रीय प्रतिनिधींच्या या बैठकीत, आरोग्यसेवा, अणु-आधारित शेती व अन्न तंत्रज्ञान, जलसंपदा व्यवस्थापन, किरणोत्सर्ग तंत्रज्ञान, शाश्वत पर्यावरण विकास तसेच क्षमताबांधणी, अशा विविध क्षेत्रांतील सुरू असलेल्या व भविष्यातील सहकार्य कार्यक्रमांवर चर्चा केली जाणार आहे.

कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रतिनिधींसाठी ACTREC — म्हणजेच टाटा मेमोरियल सेंटरच्या कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठीचे प्रमुख केंद्र —येथे तांत्रिक दौरा आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय, अणुऊर्जेच्या बिगर-विद्युत वापरांवरील तंत्रज्ञान-विषयक प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार असून, त्याद्वारे उपस्थित प्रतिनिधी आणि भाभा अणु संशोधन केंद्रातील विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत शास्त्रज्ञ व अभियंते यांच्यात संवाद आणि परस्परसंवादाला प्रोत्साहन मिळेल.

त्यासोबतच, सर्व प्रतिनिधींना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरांचा अनुभव घेता यावा, या हेतूने, एक सांस्कृतिक सहलही आयोजित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय प्रतिनिधी बैठकीत होणाऱ्या विचारमंथनातून, या वर्षीच्या उत्तरार्धात, आयएईएच्या व्हिएन्ना इथे प्रस्तावित 70व्या महासभेसाठी नियोजित असलेल्या चर्चा आणि एकत्रित कृती यांसाठी दिशा आणि मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

भारताकडे 2026 या वर्षासाठी आरसीएचे अध्यक्षपद असून, त्या नात्याने, भागीदारी प्रणित प्रादेशिक सहकार्य आणि अणुऊर्जेचा शांततेसाठी, समाजिक लाभासाठीचा वापर करण्याच्या भारताच्या बांधिलकीचा परिचय यातून होतो.

विश्व बंधू भारत या तत्वानुसार आचरण करणाऱ्या, आणि ‘भारत तुमच्या बाजूने” या संकल्पनेवर आधारित, असा भारताचा या आरसीए च्या अध्यक्षीय कारकीर्दीत दृष्टिकोन असून, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामायिक प्रगती यांच्या माध्यमातून, सर्व सदस्य देशांसाठी परस्पर सहकार्याचा मार्ग अधिक मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या बैठकीत, तंत्रज्ञान निगडीत विचारमंथनही होणार आहे, त्याशिवाय, आयसीए कार्यक्रम अंमलबजावणीचा आढावा, भविष्यातील सरकारविषयक कृतीवर चर्चा आणि आयएईए च्या 70व्या महासभेदरम्यान आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि तांत्रिक दौरे यांचाही समावेश असेल.

आरसीए विषयी :

प्रादेशिक सहकार करार आरसीए हा आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील अणुविज्ञान व अणुतंत्रज्ञानाशी संबंधित सहकारी संशोधन, विकास आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल आंतरसरकारी मंच आहे. हा करार 1972 मध्ये अमलात आला असून, सध्या आशिया-प्रशांत क्षेत्रातील 22 देश या कराराचे सदस्य आहेत.

आरसीए मध्ये भारताची भूमिका

आरसीए च्या स्थापनेपासून भारताने या संस्थेच्या विकासात मूलभूत आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आरसीएची संकल्पना प्रथम 1964 मध्ये मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) येथे आयोजित आयएईए परिषदेदरम्यान मांडण्यात आली होती. याच परिषदेत आशिया आणि प्रशांत क्षेत्रासाठी अणुविज्ञानातील प्रादेशिक सहकार्याची कल्पना प्रथम पुढे आली.

आरसीए चा संस्थापक सदस्य म्हणून भारताने वैज्ञानिक कौशल्य, प्रशिक्षण कार्यक्रम, तंत्रज्ञान प्रसार, तज्ज्ञ मोहिमा आणि संस्थात्मक भागीदारी यांच्या माध्यमातून प्रादेशिक सहकार्यास सातत्याने योगदान दिले आहे.

भारताकडे, या वर्षात, आरसीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असणे, म्हणजे, शांतता, प्रगती आणि समृद्धी साठी प्रादेशिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठीच्या कटिबद्धतेला नव्याने अधोरेखित करणे आहे. अणुऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने, भारत या विधायक आणि शांततामय वापरावर भर देत राहील.

 

नितीन फुल्लुके / भक्ती सोनटक्के / राधिका अघोर /प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 2263298) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English