संरक्षण मंत्रालय
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, एनडीए च्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्याची करणार पाहणी
पुदुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी असतील दीक्षांत समारंभाच्या प्रमुख पाहुण्या
राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अंदाजे 355 कॅडेट्स होणार उत्तीर्ण
Posted On:
20 MAY 2026 3:30PM by PIB Mumbai
पुणे, 20 मे 2026
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)च्या 150व्या तुकडीचा प्रतिष्ठित दीक्षांत संचलन सोहळा 30 मे 2026 रोजी पुण्यातील खडकवासला येथील प्रतिष्ठित खेतरपाल परेड मैदानावर होणार आहे.

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम हे परीक्षण अधिकारी म्हणून संचलनाचे निरीक्षण करतील. अकादमीमध्ये दिलेल्या कठोर लष्करी आणि शैक्षणिक प्रशिक्षणाची यशस्वी सांगता म्हणून, स्प्रिंग टर्म – 2026 च्या भव्य समारंभपूर्वक संचलनादरम्यान लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे अंदाजे 355 कॅडेट्स उत्तीर्ण होणार आहेत.
150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यापूर्वी 29 मे 2026 रोजी हबीबुल्ला हॉल, एनडीए येथे आयोजित दीक्षांत समारंभाला निवृत्त आयपीएस अधिकारी आणि पुदुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार असून पदवीधर कॅडेट्सना संबोधित करणार आहेत.
व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी, एव्हीएसएम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय संरक्षण अकादमी, सर्वसमावेशक त्रिसेवा प्रशिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राच्या भावी लष्करी नेत्यांना घडवण्याची आपली समृद्ध परंपरा कायम राखत आहे.
लष्करी शिक्षणाचा पाया घालणारी संस्था म्हणून ओळखली जाणारी, राष्ट्रीय संरक्षण अकादमी ही देशातील प्रमुख त्रिसेवा प्रशिक्षण संस्था असून जगातील उत्कृष्ट लष्करी अकादमींपैकी एक आहे. या अकादमी मधील कॅडेट्सना संरक्षण दलांमध्ये नेतृत्त्व करण्यासाठी सज्ज करण्याच्या दृष्टीने अत्यंत कठोर लष्करी शिक्षणाबरोबरच शैक्षणिक आणि चरित्र निर्माण प्रशिक्षण देखील दिले जाते.
दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये एक भव्य लष्करी संचलन, तुकड्यांची पाहणी, पदके आणि पुरस्कार प्रदान सोहळा, लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टरचे फ्लाय-पास्ट आणि पदवीधर कॅडेट्सद्वारे सादर केला जाणारा पारंपरिक ‘अंतिम पग’ समारंभ यांचा समावेश असेल.
हा सोहळा म्हणजे कॅडेट्स, पालक, प्रशिक्षक आणि संरक्षण दल परिवारासाठी एक अभिमानास्पद आणि भावनिक क्षण असून युवा कॅडेट्सचे रूपांतर राष्ट्रसेवेसाठी समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या भविष्यातील लष्करी नेतृत्त्वामध्ये होण्याचे ते प्रतीक आहे.
नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2263218)
अभ्यागत कक्ष : 37