शिक्षण मंत्रालय
नीट युजी 2026 पेपरफुटी प्रकरण – जीवशास्त्र प्रश्नपत्रिका कथितरित्या फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून पुण्यातील एनटीए तज्ज्ञाला अटक
नीट युजी 2026 पेपरफुटीप्रकरणी सीबीआयकडून पुण्यातील वरीष्ठ शिक्षकाला अटक
Posted On:
16 MAY 2026 6:42PM by PIB Mumbai
केंद्रिय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नीट यूजी 2026 परीक्षेतील जीवशास्त्राचे प्रश्न कथितरित्या फुटल्या प्रकरणी आणखी एका सूत्रधाराला अटक केली आहे.
सीबीआयने दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर पुणे येथील मनिषा गुरुनाथ मंधारे या वरीष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिकेला दिल्लीत अटक केली. मंधारे यांचा नीट युजी 2026 परीक्षा प्रक्रियेशी संबंध होता आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) त्यांची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. त्यांना कथितरित्या वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा संपूर्ण प्रश्नसंच उपलब्ध होता.
मंधारे यांनी या प्रकरणी 14 मे 2026 रोजी अटक झालेल्या अन्य आरोपी मनिषा वाघमारे यांच्या माध्यमातून नीट परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना एकत्र केले, असे तपासात आढळून आले आहे. तसेच मंधारे यांच्या पुण्यातील निवासस्थानी घेतल्या जाणाऱ्या विशेष शिकवणी वर्गात वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयाचे अनेक प्रश्न उघड करुन त्यावर चर्चा केली गेली आणि विद्यार्थ्यांना त्याची उत्तरे थेट सांगितली गेली असेही तपासात आढळून आले. विद्यार्थ्यांना हे प्रश्न वहीत लिहून पाठ्यपुस्तकात त्यांच्या उत्तरांवर खुणा करण्याची सूचना दिल्याचाही संशय आहे. यातील बरेच प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या नीट युजी प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे असल्याचे आढळून आले आहे.
गेल्या 24 तासांमध्ये सीबीआयने देशभरातील सहा शहरांमध्ये छापे टाकून वादग्रस्त साहित्य, लॅपटॉप, बँक स्टेटमेंटस आणि मोबाइल फोन ताब्यात घेतले. जप्त केलेल्या साहित्याचा सखोल तपास केला जात आहे.
सीबीआयने 12 मे 2026 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. केंद्रिय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील उच्च शिक्षण विभागाने नीट युजी 2026 परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची लेखी तक्रार नोंदवल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला.
आतापर्यंत या प्रकरणी दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे व अहिल्यानगर येथून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील पाच जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना सविस्तर चौकशीसाठी सात दिवसांच्या पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली. काल अटक केलेल्या दोन आरोपींना पुण्यातील न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाकडून त्यांना दिल्लीला हलवण्याची परवानगी घेऊन त्यांना दिल्लीला हलविण्यात आले. त्यांना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
आतापर्यंत केलेल्या तपासात रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न उघड करणारे स्रोत समोर आले असून विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम करणाऱ्या मध्यस्थांची भूमिका देखील उघडकीस आली आहे. या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेवर चर्चा झालेल्या विशेष शिकवणी वर्गासाठी भरमसाठ फी भरल्याचा संशय आहे. विशेष पथकांद्वारे या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणी सर्वंकष, पारदर्शी व निष्पक्ष चौकशी करण्याची वचनबद्धता सीबीआयने पुन्हा एकदा बोलून दाखविली आहे.
***
माधुरी पांगे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2261818)
अभ्यागत कक्ष : 20