ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने नाशिक येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्ससाठी बीआयएस प्रमाणपत्राबाबत जनजागृती परिसंवादाचे केले आयोजन
Posted On:
15 MAY 2026 8:50PM by PIB Mumbai
भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने नाशिक उद्योग आणि उत्पादक संघटनेच्या (NIMA) सहकार्याने नाशिक येथे 15 मे 2026 रोजी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्ससाठी बीआयएस प्रमाणीकरण यावर जनजागृती परिसंवाद आयोजित केला होता.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच स्टार्टअप्स, उद्योजक आणि उत्पादकांसाठी बीआयएस प्रमाणपत्राशी संबंधित योजना, भारतीय मानके आणि गुणवत्ता नियंत्रण आदेश यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तेविषयी जागरुकता, उत्पादनाचे मानकीकरण, ग्राहक विश्वास आणि व्यवसाय सुलभता यांना प्रोत्साहन देणे हा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात निमा (NIMA)च्या कौशल्य आणि स्टार्टअप्स समितीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. निमाचे अध्यक्ष आशीष नहार यांनी स्वागतपर भाषण करताना औद्योगिक विकास आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी गुणवत्ता मानके आणि प्रमाणीकरणचे महत्त्व अधोरेखित केले.
बीआयएस मुंबई शाखा कार्यालयाचे वरिष्ठ संचालक आणि प्रमुख, आर. आर. सिंग यांनी उद्घाटनपर भाषणात देशभरात मानकीकरणाला प्रोत्साहन देण्यातील, प्रमाणीकरण तसेच गुणवत्तेची खात्री देण्यासंदर्भातील बीआयएस ची भूमिका अधोरेखित केली. उद्योग तसेच स्टार्टअप्स यांनी भारतीय मानके स्वीकारुन बीआयएस प्रमाणीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बीआयएस च्या मुंबई शाखा कार्यालयाच्या संयुक्त संचालक शीतल पाटील यांनी तांत्रिक सत्रांमध्ये मार्गदर्शन करताना, बीआयएस प्रमाणीकरण योजना, गुणवत्ता नियंत्रण आदेश तसेच एमएसएमई आणि स्टार्टअप्सना उपलब्ध असेलेल्या सहाय्य यंत्रणांविषयी सविस्तर माहिती दिली. याशिवाय, प्रमाणीकरण प्रक्रिया आणि अनुपालनासाठी आवश्यक बाबींविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय या परिसंवादात प्रश्नोत्तर सत्र देखील आयोजित करण्यात आले, यामध्ये सहभागींनी प्रमाणीकरण प्रक्रिया, मानकांची अंमलबजावणी आणि नियामक अनुपालन याविषयांवरील प्रश्नांना उत्तरे दिली.
या परिसंवादाला नाशिक तसेच परिसरातील एमएसएमयेई उद्योजक, स्टार्टअप्स, व्यावसायिक, उत्पादक आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला.

***
सुषमा काने/भक्ती सोनटक्के/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2261659)
अभ्यागत कक्ष : 5