कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नीट-युजी 2026  पेपरफूटी प्रकरणातील सूत्रधाराला सीबीआयकडून अटक

Posted On: 15 MAY 2026 7:38PM by PIB Mumbai

 

नीट-युजी (NEET-UG) 2026 पेपरफूटी प्रकरणातील सूत्रधाराची  केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) ओळख पटवली असून त्याला अटक केली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए), अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेले रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध होऊ शकत होत्या  असे तपासात आढळून आले आहे. एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात, त्याने या प्रकरणातील आणखी एक आरोपी, मनीषा वाघमारे हिच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना एकत्र आणले, आणि पुणे येथील आपल्या निवासस्थानी या विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग घेतले, असा सीबीआय चा आरोप आहे. या प्रकरणी मनीषा वाघमारे या आरोपीला सीबीआयने 14.05.2026 रोजी अटक केली.

या विशेष शिकवणी वर्गांदरम्यान, पी.व्ही. कुलकर्णी याने प्रश्न, उत्तराचे पर्याय आणि अचूक उत्तरे सांगितल्याचा आरोप आहे. अशा प्रकारे तोंडी सांगितलेले प्रश्न विद्यार्थ्यांनी त्यांच्या वहीत लिहून घेतले होते आणि ते, 03.05.2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या नीट-युजी 2026 परीक्षेच्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळले आहेत.

पी.व्ही. कुलकर्णी हा मूळचा लातूर येथील असून, सखोल चौकशीनंतर त्याला पुण्यात अटक करण्यात आली. गेल्या 24 तासांत सीबीआयने देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाइल फोन जप्त केले. जप्त केलेल्या वस्तूंचे सखोल न्यायवैद्यक आणि तांत्रिक विश्लेषण सुरू आहे.

नीट-यूजी 2026 कथित पेपरफूटी प्रकरणी शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीवरून, सीबीआयने 12.05.2026 रोजी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ विशेष पथके स्थापन करण्यात आली आणि देशभरात विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.

कालपर्यंत जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी पाच आरोपींना यापूर्वीच न्यायालयात हजर करण्यात आले असून, सखोल चौकशीसाठी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. काल अटक करण्यात आलेल्या अन्य दोन आरोपींना, ट्रान्झिट रिमांडसाठी पुण्याच्या न्यायालयात हजर करण्याची आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला हलवण्याची कार्यवाही सुरू आहे.

आतापर्यंत केलेल्या तपासातून, रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेच्या गळतीचा मूळ स्रोत समोर आला आहे, तसेच प्रश्नसंच उघड करून, त्यावर चर्चा करणाऱ्या विशेष शिकवणी वर्गांना लाखो रुपये खर्च करून हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यात मध्यस्थांनी बजावलेली भूमिका उघडकीला आली आहे.

या प्रकरणाचा सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास करण्यासाठी सीबीआय वचनबद्ध आहे.

***

नीलिमा चितळे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2261645) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English