सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा विज्ञान केंद्रात “माझा स्वतःचा संग्रह” प्रदर्शनासह आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 2026 सोहळ्याचे आयोजन 

Posted On: 15 MAY 2026 12:58PM by PIB Mumbai

  

गोव्यातील पणजी येथील गोवा विज्ञान केंद्रात गोवा शासनाच्या संग्रहालय संचालनालयाच्या सहकार्याने, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वारसा जतन करण्यात संग्रहालयांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे 16 ते 18 मे 2026 दरम्यान आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन 2026 साजरा केला जाणार आहे.

या वर्षीचा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन “संग्रहालये विभाजित जगाला एकत्र आणतात” या संकल्पनेनुसार साजरा केला जात आहे. ही संकल्पना जगभरातील समुदायांमध्ये संवाद, सामंजस्य, सर्वसमावेशकता आणि शांतता वाढविण्यात संग्रहालयांच्या भूमिकेवर भर देते.

उत्सवाचा एक भाग म्हणून, “माझा स्वतःचा संग्रह” नावाचे एक प्रदर्शन आयोजित केले जाणार असून गोव्याच्या विविध भागांतील 25 हौशी संग्राहक आपली नाणी, टपाल तिकिटे, पुरातन वस्तू, जीवाश्म, कलाकृती, खेळणी, विंटेज वस्तू, दुर्मिळ पुस्तके आणि इतर संग्रहणीय वस्तूंसह त्यांचे अद्वितीय संग्रह या प्रदर्शनात प्रदर्शित करणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन 16 मे 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता होईल आणि ते 18 मे 2026 पर्यंत दररोज सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.30 पर्यंत पणजी येथील गोवा विज्ञान केंद्रात सर्वांसाठी खुले राहील.

“प्राचीन काळापासून 2019 पर्यंतचा गोव्याचा इतिहास आणि वारसा” या विषयावर 16 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता एक व्याख्यानही आयोजित केले जाणार आहे. मिरामार येथील धेंपे कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे सहयोगी प्राध्यापक प्रजल साखरदांडे हे व्याख्याते असतील. व्याख्यानानंतर एक संवादात्मक प्रश्नोत्तर सत्र होईल.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या सोहळ्याचा समारोप कार्यक्रम 18 मे 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता आयोजित होईल. समारोप समारंभाला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

विद्यार्थी, अभ्यागत आणि सर्वसामान्य जनतेला प्रदर्शनाला भेट देण्याचे तसेच व्याख्यान कार्यक्रमात सहभागी होऊन विविध संग्रहांचे महत्त्व, वैशिष्ट्ये आणि वारसा जतन याबद्दल जाणून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे,

***

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

Follow us on social media: PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2261359) अभ्यागत कक्ष : 58
Read this releasein: English