अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशिक्षण आणि क्षमता विकासामधील सहकार्यासाठी एनएडीटी-आरसी आणि एनएसीआयएन-झेडटीआय यांच्यात सामंजस्य करार


शैक्षणिक आणि क्षमता विकासातील सहकार्यासाठी सीबीडीटी आणि सीबीआयसी या प्रशिक्षण संस्थांचा सहयोग

Posted On: 14 MAY 2026 5:54PM by PIB Mumbai

मुंबई, 14 मे 2026

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, प्रादेशिक केंद्र, मुंबई (एनएडीटी-आरसी, मुंबई) आणि राष्ट्रीय सीमाशुल्क,अप्रत्यक्ष कर आणि अंमली पदार्थ नियंत्रण अकादमी, विभागीय प्रशिक्षण संस्था, मुंबई (एनएसीआयएन-झेडटीआय, मुंबई) यांनी बुधवार, 13 मे 2026 रोजी एनएसीआयएन-झेडटीआय, मुंबई, येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. शैक्षणिक सहकार्य, प्रशिक्षण आणि क्षमता विकास, या क्षेत्रांमध्ये संस्थात्मक सहयोगासाठी एक सुव्यवस्थित चौकट प्रस्थापित करणे, हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

एनएडीटी-आरसी, मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर, आणि एनएसीआयएन-झेडटीआय, मुंबईचे, प्रधान अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक सदस्य आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित होते.

आंतर-विभागीय समन्वय बळकट करणे, व्यावसायिक उत्कृष्टता वाढवणे आणि सहयोगी शिक्षण आणि ज्ञानाची-देवाणघेवाण, या उपक्रमांद्वारे भारत सरकारच्या या दोन प्रमुख प्रशिक्षण संस्थांमधील संस्थात्मक समन्वय वाढवणे, हे या कराराचे उद्दिष्ट आहे.

या सामंजस्य करारांतर्गत सहकार्याची व्याप्ती कार्यात्मक आणि वर्तवणुकीशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये असेल. यात कर आकारणी आणि वित्त, प्रशासन आणि व्यवस्थापन, खरेदी प्रक्रिया, वित्तीय नियम, तपास तंत्र, डेटा ॲनालिटिक्स, न्यायवैद्यक विषयक  विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता, डार्क वेब तपास आणि प्रशिक्षण गरज मूल्यमापन, या उपक्रमांचा समावेश आहे. दोन्ही संस्था त्यांच्याकडचे अध्यापक, प्रशिक्षण संसाधने, अभ्यासक्रम साहित्य, शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि संशोधन कौशल्ये यांची देवाणघेवाण करतील. तसेच, दोन्ही विभागांच्या अखत्यारीत येणाऱ्या वैधानिक तरतुदी, अनुपालन यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान प्रणाली, तपास पद्धती आणि डेटा रिपोर्टिंग संरचेशी संबंधित सर्वोत्तम कार्यपद्धतींची देखील परस्परांशी देवाणघेवाण करतील.

या भागीदारीचा उद्देश दोन्ही विभागांमधील अधिकारी आणि प्रशिक्षणार्थींच्या व्यावसायिक क्षमतांमध्ये वाढ करणे, तसेच संस्थात्मक अध्ययनाला चालना देणे हा असून, यासाठी संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा, विशेष व्याख्याने, नेटवर्किंग कार्यक्रम आणि परस्पर अभ्यास भेटींचे आयोजन करण्याची यात तरतूद करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना एनएसीआयएन-झेडटीआय मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांनी डिजिटल युगात समन्वय आणि सहकार्याच्या वातावरणाची गरज अधोरेखित केली. त्यांनी नमूद केले की संयुक्तपणे तयार केलेले अभ्यासक्रम सध्याचे अडथळे दूर करण्यात सहाय्य करतील आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अधिकाऱ्यांना सुसज्ज करतील. कर अधिकारी हे देशाच्या आर्थिक हितांचे रक्षण करणारे "महसूल सैनिक" आहेत, असे सांगून, प्रभावी कर प्रशासनासाठी निरंतर प्रशिक्षण, ज्ञानाची देवाणघेवाण आणि संस्थात्मक सहकार्य अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या भागीदारीमुळे संस्थात्मक क्षमता लक्षणीयरीत्या बळकट होईल, आणि प्रशिक्षण पद्धतींमध्ये नवोन्मेषाला चालना मिळेल, असे एनएडीटी-आरसी, मुंबईचे प्रधान अतिरिक्त महासंचालक नवनीत मनोहर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, दोन्ही संस्थांमधील शाश्वत शैक्षणिक आणि प्रशिक्षण सहकार्य अधिक व्यावसायिक क्षमतेसह कर प्रशासनाच्या सतत बदलत्या मागण्या पूर्ण करणारे अधिकारी तयार करेल.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर‍

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2261107) अभ्यागत कक्ष : 30
Read this releasein: English