इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सोसायटी फॉर ऍप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) आणि आयस्ट्रॅक/इस्रो यांच्यात खोल अंतराळ मोहिमांमधील तंत्रज्ञान विषयक प्रगतीसाठी सामंजस्य करार
स्वदेशी उच्च शक्ती प्रणाली आणि गॅलियम नायट्राइड (GaN)-आधारित तंत्रज्ञान विकसित करणे हा सहकार्याचा उद्देश
Posted On:
13 MAY 2026 6:05PM by PIB Mumbai
आज एका ऐतिहासिक कार्यक्रमात, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), अंतराळ विभाग अंतर्गत कार्यरत इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) हे केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर) ही स्वायत्त संशोधन आणि विकास प्रयोगशाळा यांनी, खोल अंतराळातील संशोधनात्मक निरीक्षणांसाठी स्वदेशी सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक उच्च शक्ती प्रणालींची रचना आणि विकास करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. प्रत्येक ग्राउंड स्टेशनमध्ये, टेलि-कमांड सिग्नल उपग्रहाकडे प्रसारित करण्यापूर्वी त्याला प्रवर्धित करण्यासाठी उच्च शक्ती प्रणालींची आवश्यकता असते.

या सामंजस्य करारावर ISTRAC/ISRO चे संचालक डॉ. ए. के. अनिल कुमार आणि समीरचे महासंचालक डॉ. पी. हनुमंत राव यांनी स्वाक्षरी केली. हा सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभ मुंबईतील आयआयटी बॉम्बे येथील समीर मुख्यालयात पार पडला.
डॉ. ए. के. अनिल कुमार यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली आणि देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी व तंत्रज्ञान प्रगतीसाठी या सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, इंडियन डीप स्पेस नेटवर्क (IDSN) स्टेशनवरील टेलिकमांड ऑपरेशन्ससाठी हाय-पॉवर ॲम्प्लिफायर (HPA) सोल्यूशन्समधील प्रस्तावित घडामोडी एक्स-बँड फ्रिक्वेन्सी बँडमध्ये कार्यरत असलेल्या इस्रोच्या मोहिमांना सहाय्य करतील.

डॉ. पी. हनुमंत राव म्हणाले की, हा उपक्रम 'आत्मनिर्भर भारत'च्या घोषित संकल्पनेनुसार समीर (SAMEER) आणि इस्रोच्या तंत्रज्ञान क्षमता बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. स्वदेशी बनावटीच्या अनेक उच्च-शक्तीच्या गॅलियम नायट्राइड (GaN) सेमीकंडक्टर मॉड्यूल्ससह उच्च-शक्ती प्रणालींमधील प्रस्तावित समीर-इस्ट्रॅक (SAMEER-ISTRAC) सहकार्य, भारताला जागतिक अंतराळ संस्थांच्या बरोबरीने स्थान मिळवून देऊ शकते. या विकासामुळे गॅटेक/डीआरडीओ (GATEC/DRDO) कडून स्वदेशी बनावटीच्या GaN पॉवर मॉड्यूल्सचा वापर करून परदेशी ओईएम (OEMs) वरील अवलंबित्व कमी होईल.
इस्ट्रॅक (ISTRAC) हे इस्रोच्या सर्व लो अर्थ ऑर्बिट उपग्रह, प्रक्षेपण यान मोहिमा आणि एस/एक्स बँडमध्ये (S/X Band) कार्यरत असलेल्या डीप स्पेस मोहिमांसाठी टेलिमेट्री रिसेप्शन , ट्रॅकिंग आणि कमांडिंगची जबाबदारी पार पाडते.
समीर (SAMEER) ही संस्था धोरणात्मक आणि नागरी अशा दोन्ही उपयोगांसाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF), मायक्रोवेव्ह आणि मिलिमीटर तंत्रज्ञानामध्ये, सुरुवाती पासून शेवट पर्यंत ('एंड-टू-एंड) उपाय तयार करण्यात विशेष प्राविण्य मिळवलेली संस्था आहे.
समीर आणि इस्ट्रॅक (आय एस टी आर ए सी) यांच्यातील ही भागीदारी केवळ एका करारापुरती मर्यादित नसून, तंत्रज्ञानाची नवीन क्षितिजे गाठण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे ती प्रतिनिधित्व करते. ही भागीदारी, इस्रोच्या (आय एस आर ओ) भविष्यातील 'डीप स्पेस' (खोल अंतराळ) कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या पुढील पिढीच्या तंत्रज्ञानामध्ये निरंतर संशोधन आणि विकास उपक्रम राबवून या क्षेत्राला नवसंजीवनी देईल, अशी अपेक्षा आहे.

या भागीदारीच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये संयुक्त संशोधन आणि विकासाचा समावेश आहे. यामध्ये, खोल अंतराळातील संपर्क ब्यवस्थेसाठी (डीप स्पेस कम्युनिकेशन्स) लागणारे 'हाय पॉवर अँप्लिफायर' तंत्रज्ञान विकसित करण्याच्या एकत्रित कौशल्याचा उपयोग करून उपयोजनयोग्य सोल्युशन्स तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. ही भागीदारी, संरक्षण आणि संशोधन विकास संस्था-डीआरडीओच्या, 'गॅटेक' (GAETEC) कडून प्राप्त होणाऱ्या पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या 'गॅलियम नायट्राइड' (GaN) चिप तंत्रज्ञानाचा वापर करून स्वदेशी सेमीकंडक्टर तंत्रज्ञानावर देखील भर देते. याव्यतिरिक्त, प्रस्तावित सहकार्य, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग क्षेत्र (एमएसएमई) आणि भारतीय उद्योगांना संकल्पनेपासून ते मोठ्या प्रमाणावरील उत्पादनापर्यंत नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास मदत करून औद्योगिक परिसंस्था अधिक मजबूत करेल.
समीर आणि इस्ट्रॅक यांच्यातील या सहकार्याचा उद्देश तांत्रिक पायाभूत सुविधा वाढवणे हा असून, याचे संभाव्य फायदे केवळ अंतराळ संशोधनापुरते मर्यादित न राहता त्याही पलीकडे असतील. ही भागीदारी भविष्यातील क्रांतिकारक कामगिरीचा मार्ग मोकळा करेल आणि सरकारी संशोधन आणि विकास संस्थांमधील सहकार्याचा एक नवीन आदर्श प्रस्थापित करेल, असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच 'आत्मनिर्भर भारत' या राष्ट्रीय उपक्रमात ही भागीदारी अत्यंत मोलाची भूमिका बजावेल.
***
शैलेश पाटील/सुषमा काणे/आशुतोष सावे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260826)
अभ्यागत कक्ष : 37