अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्राप्तिकर कायदा, 2025 या विषयावर प्राप्तिकर विभागाच्यावतीने मुंबईत भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन


व्यवसाय सुलभता आणि आत्मनिर्भर भारतासाठी सहाय्यक असलेल्या अधिक सरलीकृत, डिजिटल सक्षम कर प्रणालीचे अग्रणी उद्योगपती, नागरिक आणि कर तज्ज्ञांकडून स्वागत

नवीन करप्रणालीमुळे नागरिक आणि सरकार यांच्यातील विश्वास दृढ होईल, डॉ. निरंजन हिरानंदानी यांचे मत

कर-संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सीबीडीटीने घेतलेला पुढाकार आणि कर प्रशासनासाठीच्या डिजिटल उपक्रमांचे अभिनेता अर्जुन कपूरने केले स्वागत

Posted On: 12 MAY 2026 7:39PM by PIB Mumbai

मुंबई, 12 मे 2026

प्रधान प्राप्तिकर आयुक्त कार्यालय, मुंबई च्या वतीने 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेल्या प्राप्तिकर कायदा, 2025 विषयी जनजागृती करण्यासाठी आज भव्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राप्तिकर कायदा, 1961 च्या जागी हा नवीन कायदा लागू करण्यात आला असून बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेशी सुसंगत सोपी, अधिक पारदर्शक आणि करदात्यांना सोयीची ठरेल अशी प्रणाली उपलब्ध करून देणे हा त्यामागील उद्देश आहे.

करदात्यांना आणि अन्य संबंधितांना नवीन कायद्यातील तरतुदी समजावून सांगण्यासाठी तसेच पूर्वीच्या कर चौकटीतून नवीन चौकटीत सुलभपणे संक्रमण करता यावे, या उद्देशाने प्राप्तिकर विभागाच्या 'प्रारंभ 2026' या देशव्यापी उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सनदी लेखापाल, व्यापार आणि उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, करदाते, कर तज्ञ आणि वरिष्ठ कॉर्पोरेट अधिकाऱ्यांसह 700 हून अधिक सहभागी उपस्थित होते.

प्रमुख सहभागींमध्ये हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी; मोतीलाल ओसवाल ग्रुपचे अध्यक्ष रामदेव अग्रवाल; अर्जुन कपूर; आणि आयसीएआयचे माजी अध्यक्ष सी.एस. नंदा यांचा समावेश होता.

करदात्यांना करविषयक कायदे समजण्यास सोपे आणि अनुपालन अधिक सोयीस्कर व्हावे अशा पद्धतीने नवीन कायद्याची रचना करण्यात आली असल्याचे मुंबईचे प्रधान मुख्य प्राप्तिकर आयुक्त आलोक कुमार यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. अनेक दशके केल्या गेलेल्या सुधारणा आणि क्लिष्ट तरतुदींमुळे पूर्वीची करप्रणाली सामान्य करदात्यांना समजण्यास कठीण झाली होती, त्यामुळे नवीन कायद्यात आधुनिक आणि डिजिटल-समर्थित संरचनेद्वारे अनुपालन सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.

या संक्रमण काळात करदात्यांना साहाय्य करण्यासाठी मुंबईत जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

नवीन प्राप्तीकर संरचनेमुळे पारदर्शकतेला चालना मिळेल, अनेक क्लिष्ट तरतुदी काढून टाकल्या असल्यामुळे कर-अनुपालनाची प्रक्रिया सुलभ होईल त्याचबरोबर नागरिक आणि सरकार यांच्यातील विश्वास दृढ होईल, असे निरंजन हिरानंदानी म्हणाले. ही विकासाभिमुख आणि डिजिटलदृष्ट्या पारदर्शक करप्रणाली गुंतवणुकीला पूरक ठरेल, तसेच व्यवसाय करण्यातील सुलभता वाढून जीवनमान उंचावेल आणि भारताच्या आर्थिक समृद्धीसोबतच 'आत्मनिर्भर भारत' या संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये मोलाचे योगदान देईल, असेही त्यांनी नमूद केले.

कराशी संबंधित प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अभिनेता अर्जुन कपूर यांनी प्राप्तीकर विभागाचे आभार मानले. नवीन संरचना आणि डिजिटल प्रणालीमुळे लोकांना करासंबंधी गोष्टी समजून घेणे आणि त्या पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे हाताळणे सुलभ होईल असे ते म्हणाले.

नवीन कायद्यामुळे करप्रणालीमध्ये कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयचा अधिकाधिक वापर सुलभ होईल आणि खटल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असे मत  ‘आयसीएआय’ चे माजी अध्यक्ष सी.एस. नंदा यांनी व्यक्त केले. या नवीन कार्यप्रणालीचे फायदे देशातील प्रत्येक करदात्यापर्यंत पोहोचतील, याची खात्री करणे हेच विभागाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नवीन कायद्यातील महत्त्वाच्या पैलूंवर सविस्तर सादरीकरण केले. सुलभ तरतुदी, सुधारित रचना आणि अनुपालनाच्या आवश्यकता कमी करण्याच्या उद्देशाने केलेल्या उपाययोजनांचा त्यात समावेश होता. कार्यक्रमादरम्यान, करदात्यांच्या सोयीसाठीचे दोन उपक्रम, कर सेतू (माहितीपूर्ण प्रश्नोत्तरांची पुस्तिका) आणि कर साथी, चोवीस तास मदत करणारा एआय आधारित चॅटबॉट यांचाही परिचय करून देण्यात आला.

या कार्यक्रमात संवादात्मक सत्रही आयोजित करण्यात आले होते. त्यामध्‍ये   कर विवरण पत्र  भरणे, कर भरणे आणि नवीन कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित प्रश्न सहभागी व्यक्तींनी विचारले. तसेच, सहज-सोप्या आणि आकर्षक पद्धतीने लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी नवीन कायद्यावर आधारित पथनाट्यदेखील सादर करण्यात आले.


सुवर्णा बेडेकर/मंजिरी गानू/पर्णिका हेदवकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


 


(Release ID: 2260398) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English