शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संकुलात भारताच्या पहिल्या एकात्मिक कार्बन संकलन, उपयोग आणि साठवणूक क्षेत्रीय प्रयोगशाळेचे उद्घाटन
'भारत इनोव्हेट्स 2026'अंतर्गत एक महत्त्वाचा उपक्रम
Posted On:
11 MAY 2026 10:32PM by PIB Mumbai
मुंबई, 11 मे 2026
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज भारत इनोव्हेट्स 2026 या उपक्रमा अंतर्गत भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या, मुंबई (आयआयटी बॉम्बे) इथल्या संकुलात उभारलेल्या भारताच्या पहिल्या एकात्मिक कार्बन संकलन, उपयोग आणि साठवणूक (CCUS - Carbon Capture, Utilisation and Storage) क्षेत्रीय प्रयोगशाळा केंद्राचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे संचालक शिरीष केदारे, उपसंचालक प्रा. मिलिंद अत्रे, उपसंचालक प्रा. रवींद्र गुडी, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक तज्ज्ञ, शासनाचे प्रतिनिधी आणि उद्योजक उपस्थित होते.

2GLC.jpeg)
कार्बन उत्सर्जनाच्या पहिल्या टप्प्यापासून ते अखेरच्या टप्प्यापर्यंत कार्बनचे संकलन, उपयोग आणि साठवणूक करणारी भारतातली पहिलीच क्षेत्रीय प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेअंतर्गत स्वदेशी कार्बन संकलन तंत्रज्ञानाचे, कार्बनचा वापर आणि कायमस्वरूपी भूगर्भीय विलीनीकरणाच्या प्रक्रियेशी एकात्मिकरण केले गेले आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या सुविधांच्या दृष्टीने ही भारताची पथदर्शी प्रयोगशाळा ठरली आहे.

या प्रयोगशाळेअंतर्गत कार्बन शमनासाठी आत्मनिर्भरता तसेच निर्धारित उद्दिष्टांच्या स्वयंपूर्ण साखळीचा (क्लोज्ड-लूप) दृष्टिकोन अवलंबण्यात आला आहे. या दृष्टीकोनाच्या गाभ्याशी स्वदेशी नवोन्मेषाची जोड असून, हा संपूर्ण प्रकल्प आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला अनुसरून आखण्यात आला आहे. केंद्र सरकार, संबंधित उद्योग क्षेत्रातले भागीदार आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या नवोन्मेषीय परिसंस्थेच्या सहकार्याने भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या मुंबई इथल्या संकुलात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प ‘पंचामृत’ या भारताच्या हवामान विषयक वचनबद्धतेला आणि कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या दीर्घकालीन ध्येय-उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रयत्नांना पुढे घेऊन जाणारा ठरला आहे.
या एकात्मिक कार्बन संकलन, उपयोग आणि साठवणूक क्षेत्रीय प्रयोगशाळेतून, शैक्षणिक नवोन्मेष आणि प्रत्यक्ष व्यावहारिक औद्योगिक उपयोगित्व यातील दरी भरून काढण्यासाठी हाती घेतलेले संशोधन, प्रत्यक्ष ध्येयपूर्तीमध्ये परावर्तीत होण्याचे मोठे उदाहरण ठरले आहे. ‘ऊर्जानोव्हासी’ या ‘डीप-टेक’ उपक्रमाच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा विस्तार केला गेला आहे. ‘ऊर्जानोव्हासी’ हा भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या, मुंबई इथल्या संकुलातील नवोन्मेष आणि उद्योजकता संस्थेचे (एसआयएनई) प्रा. विक्रम विशाल आणि प्रा. अर्णव दत्ता यांनी स्थापन केलेला उपक्रम आहे. ऊर्जानोव्हासी हा भारत इनोव्हेट्स 2026 मध्ये सहभागी झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा आघाडीच्या नवीन उद्योगांपैकीचा एक उपक्रम आहे.
या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संबोधित केले. आजचा दिवस हा नवोन्मेषाच्या माध्यमातून भारताच्या शाश्वत विकासाच्या वाटचालीचा प्रारंभ करणारा दिवस ठरला आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई सारख्या संस्था अत्याधुनिक कार्बन संकलन आणि वापरासाठीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास आणि पर्यावरणीय जबाबदारीत समतोल साधू शकणार्या उपाययोजना विकसित करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या एकात्मिक कार्बन संकलन, उपयोग आणि साठवणूक क्षेत्रीय प्रयोगशाळेमुळे हवामान विषयक जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र, धोरणकर्ते आणि समाज यांची एकत्र मोट बांधली जात आहे. यातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या भावनेचेच प्रतिबिंब उमटले आहे असे ते म्हणाले.
J0FI.jpeg)
उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. कार्बन संकलन आणि उपयोगाशी संबंधित नवोन्मेषांच्या माध्यमातून शाश्वततेशी संबंधित समोर असलेल्या गंभीर आव्हाना़वर मात करण्यासाठी शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि धोरणकर्ते कशा रितीने एकत्र येऊन काम करू शकतात याचे उदाहरण भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईने आपल्यासमोर ठेवले असल्याचे ते म्हणाले. या उपक्रमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या संकल्पाचेच प्रतिबिंबित उमटले असल्याचे त्यांनी सांगितले. आज देश विकसित भारत 2047 चा संकल्प साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे, अशावेळी हा प्रकल्प म्हणजे देशातील इतर संस्थांसाठी हा एक मार्गदर्शक आराखडा ठरू शकतो, असे ते म्हणाले.
सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2260064)
अभ्यागत कक्ष : 40