अणुऊर्जा विभाग
मोठ्या नूतनीकरणानंतर तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या युनिट 2 चा पुनर्प्रारंभ आणि सातत्यपूर्ण कार्यान्वयनाला अणुऊर्जा नियामक परिषदेकडून मंजुरी
Posted On:
11 MAY 2026 7:22PM by PIB Mumbai
मुंबई, 11 मे 2026
अणुऊर्जा नियामक परिषदेने भारतीय अणुऊर्जा महामंडळाद्वारे करण्यात आलेल्या मोठ्या नूतनीकरणाच्या कामाच्या यशस्वी पूर्ततेनंतर, 07 मे 2026 रोजी तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या (टीएपीएस) युनिट 2 चा पुनर्प्रारंभ आणि सातत्यपूर्ण कार्यान्वयनाला मंजुरी दिली आहे.
तारापूर अणुऊर्जा केंद्राची युनिट 1 आणि 2 या बॉइलिंग वॉटर रिॲक्टर (बीडब्ल्यूआर) रचनेवर आधारित भारताच्या पहिल्या अणुभट्ट्या असून त्यांचे व्यावसायिक कामकाज 1969 मध्ये सुरू झाले होते. या नूतनीकरणाच्या कामात रिॲक्टर कुलंट रिक्र्युलेशन पाइपिंगच्या जागी प्रगत गंज-रोधक स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले फोर्ज्ड पाइपिंग बसवण्यात आले असून जोडण्या पूर्णपणे बदलण्यात आल्या आहेत. इतर सुरक्षा सुधारणांमध्ये रिॲक्टर कंटेनमेंट फिल्टर्ड व्हेंटिंग व्यवस्था (CFVS) आणि पर्यायी जलशीतक व्यवस्था (ACWS) इत्यादी कार्यान्वित करण्याचा समावेश आहे. शिवाय, सध्याच्या देखभाल कालावधीत रिॲक्टर प्रेशर व्हेसल वेल्ड्ससारख्या गंभीर घटकांची तपासणी करण्यात आली, त्यामुळे अणुभट्टीच्या आयुर्मानाचे आणि उर्वरित आयुष्याचे मूल्यांकन करता येईल. या मूल्यांकनावरून, सामान्य देखभाल आणि देखरेखीसह अणुभट्टी सुरक्षित कामकाज सुरू ठेवू शकते, असे दिसून आले आहे.
अणुऊर्जा नियामक परिषदेने आपल्या बहुस्तरीय सुरक्षा पुनरावलोकन प्रक्रियेद्वारे तारापूर युनिट-2 चे नूतनीकरण, सुरक्षासंबंधी सुधारणा आणि तपासणीशी संबंधित निकालांचा आढावा घेतला. अणुऊर्जा नियामक परिषदच्या मंडळाने 6 मे 2026 रोजी नूतनीकरण, सुरक्षासंबंधी सुधारणा आणि सविस्तर पुनरावलोकनांची दखल घेत युनिट पुन्हा सुरू करायला आणि येत्या 10 वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत ठेवायला सहमती दर्शवली. अणुऊर्जा नियामक परिषदने 7 मे 2026 रोजी तारापूर युनिट-2 सुरू करण्याची परवानगी जारी केली.
अणुऊर्जा नियामक परिषद आपली नियामक देखरेख सुरू ठेवणार असून तारापूर इथल्या युनिट 1 आणि 2 च्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवणार आहे. यापूर्वी, तारापूर युनिट-1 मध्ये देखील अशाच प्रकारचे नूतनीकरण आणि पुनरावलोकन करण्यात आले होते, त्यानंतर मंडळाने डिसेंबर 2025 च्या अखेर ते पुन्हा सुरू करायला परवानगी दिली होती. हे युनिट सध्या 160 MWe क्षमतेने कार्यरत आहे. तारापूर अणुऊर्जा केंद्राचे युनिट 1 आणि 2 हे आशियातील पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र असून ते 1969 मध्ये कार्यान्वित झाले होते. हे केंद्र महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात बोईसरजवळ तारापूर इथे आहे.
सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259984)
अभ्यागत कक्ष : 35