अर्थ मंत्रालय
नागपूर एनएडीटीमध्ये ब्रिक्स अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग /दहशतवादी वित्तपुरवठा प्रतिबंध (एएमएल/सीएफटी) क्षमता विकास उपक्रमाची यशस्वी सांगता
Posted On:
10 MAY 2026 7:58PM by PIB Mumbai
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी), नागपूर यांनी 4 ते 8 मे 2026 या कालावधीत ब्रिक्स अंतर्गत मनी लॉन्ड्रिंग /दहशतवादी वित्तपुरवठा प्रतिबंध (एएमएल/सीएफटी) क्षमता विकास उपक्रमाचे आयोजन केले होते.
भारताच्या 2026 मधील ब्रिक्स अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. लवचिकता, नवकल्पना, सहकार्य आणि शाश्वत विकासासाठी बांधिलकी, या संकल्पनेअंतर्गत भारताचे हे चौथे अध्यक्षपद आहे. हा उपक्रम ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या भारताच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. 2025 मधील रिओ दि जानेरो घोषणापत्रात ब्रिक्स नेत्यांनी अधिक समावेशक आणि शाश्वत प्रशासनासाठी जागतिक दक्षिणेकडील देशांचे सहकार्य बळकट करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून ब्रिक्स एएमएल/सीएफटी तज्ज्ञांचे हे पहिले क्षमता विकास सत्र आयोजित करण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाऱ्यांची क्षमता वाढवणे हा होता. या माध्यमातून जागतिक मानके, भविष्यातील धोके आणि आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती यांचे सखोल ज्ञान मिळवून आणि मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याचा प्रभावीपणे शोध, तपास आणि प्रतिबंध करता येईल.
प्रमुख वैशिष्ट्ये आणि तांत्रिक व्याप्ती
पाच दिवसांच्या या उपक्रमात ब्रिक्स देशांतील धोरणकर्ते, नियामक संस्था, वित्तीय गुप्तचर यंत्रणा (एफआययू), कायदा अंमलबजावणी संस्था आणि कर प्राधिकरणे सहभागी झाली होती. यात रशियन एफआययू, यूएई सार्वजनिक अभियोक्ता कार्यालय आणि दक्षिण आफ्रिकेच्या कर प्राधिकरणांच्या प्रतिनिधींसह विविध ब्रिक्स देशांतील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात एएमएल/सीएफटी संदर्भातील विविध महत्त्वपूर्ण बाबींचा एकात्मिक पद्धतीने समावेश करण्यात आला. यामध्ये जागतिक कायदे आणि संस्थात्मक व्यवस्था, विविध देशांच्या कायदेव्यवस्थांची तुलना तसेच मनी लॉन्ड्रिंग आणि कर गुन्हे कसे केले जातात याची माहिती समाविष्ट होती.
याशिवाय व्यापाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग, अमली पदार्थांची तस्करी, बेनामी व्यवहार आणि वित्तीय कृती कार्यबल (एफएटीएफ) अनुपालनाच्या संदर्भात आभासी डिजिटल मालमत्तांमधून उद्भवणारे धोके या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.
माहितीची देवाणघेवाण, परस्पर कायदेशीर सहाय्य, मालमत्ता पुनर्प्राप्ती आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यांसारख्या आंतरराष्ट्रीय सहकार्य यंत्रणांवर भर देत या कार्यक्रमाचा समारोप झाला.
***
राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2259634)
अभ्यागत कक्ष : 49