संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीजीएस अचल भारतीय तटरक्षक दलात दाखल

Posted On: 09 MAY 2026 5:50PM by PIB Mumbai

 

भारतीय तटरक्षक दलाने 9, मे 2026 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे, नवीन पिढीच्या अदम्य -श्रेणीतील जलद गस्ती जहाज मालिकेतील  जहाज, इंडियन कोस्ट गार्ड शिप (आयसीजीएस) अचल ताफ्यात दाखल करून आपल्या परिचालन क्षमतेत लक्षणीय वाढ केली आहे. 'अचल' या नावाचा अर्थ 'अढळ' असा असून, हे जहाज राष्ट्रीय सागरी हितांचे रक्षण करणे, समुद्रात जीवनाचे रक्षण करणे आणि भारताच्या सागरी सीमांची सुरक्षा सुनिश्चित करण्याबाबत  भारतीय तटरक्षक दलाच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे जहाज किनारी आणि सागरी देखरेख , प्रतिबंध, शोध आणि बचाव  , तस्करीविरोधी मोहीम आणि सागरी प्रदूषण प्रतिसाद यासह विविध प्रकारच्या सागरी मोहिमा  हाती घेईल.

 

पोलीस महानिरीक्षक टेकूर शशी कुमार, कमांडर, तटरक्षक विभाग (वायव्य), केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी यांच्या सन्माननीय उपस्थितीत,संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि महासंचालक (अधिग्रहण) ए. अंबरासू यांच्या हस्ते  हे जहाज औपचारिकपणे सेवेत दाखल करण्यात आले.

मेसर्स गोवा शिपयार्ड लिमिटेडद्वारे  स्वदेशी बनावटीची रचना  आणि बांधणी असलेले हे जहाज, भारताच्या जहाजबांधणी क्षमतेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. 50 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटकांचा समावेश असलेले हे जहाज, संरक्षण उत्पादनातील देशाचे वाढती स्वयंपूर्णता अधोरेखित करते आणि केंद्र  सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' व 'मेक इन इंडिया' उपक्रमांना अनुरूप आहे.

आयसीजीएस अचल ताफ्यात दाखल होणे हे भारतीय तटरक्षक दलाच्या विद्यमान  ताफा विस्तार कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि ते तटीय  सुरक्षा मजबूत करण्यात  आणि  परिचालन सज्जता वाढवण्यात  महत्त्वपूर्ण योगदान देईल.

***

सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2259430) अभ्यागत कक्ष : 16