अर्थ मंत्रालय
मुंबईतील भारत डायमंड बोर्स येथे प्राप्तिकर कायदा 2025 वर जनजागृती मोहीम “प्रारंभ-2026” चे आयोजन
नवीन प्राप्तिकर कायदा 2025 अंतर्गत आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्य या सत्रात जीजेईपीसी सदस्य आणि हिरे व्यापाऱ्यांचा सहभाग
Posted On:
08 MAY 2026 7:19PM by PIB Mumbai
मुंबई, 8 मे 2026
प्राप्तिकर विभाग, सीसीआयटी (आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्य निर्धारण) पश्चिम विभाग, मुंबई यांच्या वतीने “Bridging Borders, Building Trust.” या संकल्पनेखाली प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 यांवर आधारित “प्रारंभ-2026” ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषद (जीजेईपीसी) आणि भारत डायमंड बोर्स (बीडीबी), मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
या जनजागृती उपक्रमाचा उद्देश नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 च्या तरतुदींविषयी, विशेषतः आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्यावर भर देऊन जागरूकता निर्माण करणे आणि भागधारकांची समज वाढवणे हा होता. या कार्यक्रमात रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे सदस्य, भारत डायमंड बोर्सशी संबंधित व्यापारी, कर सल्लागार, सनदी लेखापाल आणि व्यापार व उद्योगातील प्रतिनिधी यांच्यासह 200 हून अधिक भागधारकांनी सहभाग नोंदवला.
आपल्या स्वागतपर भाषणात भारत डायमंड बोर्सचे उपाध्यक्ष मेहुल शाह यांनी कार्यक्षम कर प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी आणि ऐच्छिक अनुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी करदात्यांमध्ये जागरूकता आणि विभाग व उद्योग यांच्यातील रचनात्मक सहभागाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेचे उपाध्यक्ष शौनक पारिख यांनी जबाबदार कर पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विश्वासावर आधारित अनुपालन यंत्रणांना चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रातील भागधारकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुख्य प्राप्तिकर आयुक्त मुंबई पश्चिम विभागाच्या (आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण किंमत निर्धारण) निरुपमा कोटरू, आणि मोहित जैन, यांनी अधोरेखित केले की, प्राप्तिकर कायदा, 2025 हा एक सुलभ, प्रगतीशील आणि करदात्यांसाठी अनुकूल कायदा आहे. या नवीन कायद्याचा उद्देश विकसित होत असलेल्या कर प्रशासन प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवणे, गुंतागुंत कमी करणे आणि अनुपालनाची सुलभता वाढवणे हा आहे. यानंतर, नवीन कर प्रणालीअंतर्गत सादर करण्यात आलेल्या नवीनतम कायदेशीर आणि नियामक घडामोडींची सहभागींना ओळख करून देण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर कायदा, 2025 वर एक दृकश्राव्य सादरीकरण करण्यात आले.
“आंतरराष्ट्रीय कर आकारणी आणि हस्तांतरण मूल्याशी संबंधित प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 ची ओळख” या विषयावर एक संवादात्मक तांत्रिक सत्र विभागाने आयोजित केले होते. या सत्रामध्ये नवीन आणि जुन्या प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींचा तुलनात्मक आढावा घेऊन नवीन प्राप्तिकर कायदा, 2025 आणि प्राप्तिकर नियम, 2026 च्या तरतुदींची सविस्तर माहिती सहभागींना समजावून सांगण्यात आली.
या कार्यक्रमात प्राप्तिकर विभागाने करदात्यांना कर-संबंधित बाबींवर तात्काळ मार्गदर्शन आणि सहाय्य देण्यासाठी नव्याने सादर केलेल्या ‘कर साथी’ या एआय-शक्तीवर चालणाऱ्या चॅटबॉटचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2259177)
अभ्यागत कक्ष : 26