Posted On:
07 MAY 2026 6:02PM by PIB Mumbai
मुंबई, 7 मे 2026
सीएफएसएआय आणि बीसीबीए यांनी अलीकडेच जारी केलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (जेएनपीए) आपल्या कंटेनर टर्मिनल्सवर सध्या सुरू असलेल्या कामकाजाच्या परिस्थितीबद्दल खुलासा केला आहे. जेएनपीए वरील सर्व पाच कंटेनर टर्मिनल्सवर कोणत्याही गर्दीमुळे कामकाजात व्यत्यय न येता ते सुरळीतपणे सुरू असून सर्व टर्मिनल्स पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. जेएनपीए मध्ये दरदिवशी सरासरी 10 ते 12 कंटेनर जहाजे येतात आणि दररोज कंटेनरमधून आयात आणि निर्यात केल्या जाणाऱ्या जवळपास 22,000 टीईयू मालाची हाताळणी केली जाते. तेथून या मालाची इतरत्र पाठवणी करण्याचे कामकाजही स्थिरपणे सुरू असून, सुमारे 20,000 टीईयू मालाची वाहतूक रस्त्याने तर 2000 टीईयू मालाची रेल्वेने वाहतूक केली जात आहे.
जेएनपीएने दिलेल्या माहितीनुसार, पोर्ट टर्मिनल्समध्ये कोणतीही गर्दी न होता बंदरातील कामकाज विनाव्यत्यय सुरू आहे. सध्याची समस्या फ्रेट स्टेशन्स (सीएफएस) आणि कस्टम्स ब्रोकर्स (सीबी) यांनी नेमलेला कंटेनर आणि चालकांच्या कमतरतेमुळे निर्माण झाली आहे.
सीएफएस किंवा सीबी द्वारे ट्रेलर लावण्यात आल्यानंतरच टर्मिनल यार्डमध्ये रचून ठेवलेले आयात मालाचे कंटेनर्स संबंधितांपर्यंत पोहोचविले जातात. पुरेसे ट्रेलर उपलब्ध असतील हे सुनिश्चित करणे ही सीएफएस आणि सीबी यांची जबाबदारी आहे. चालक रजेवर असल्याने किंवा अनुपस्थित राहिल्याने उपलब्ध नसतील, तर त्यांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे जेएनपीएने म्हटले आहे.
टर्मिनल्सवर लोडिंगच्या प्रतीक्षेत थांबून असलेला एकही ट्रेलर शिल्लक नाही. कंटेनर वितरणाला गती देण्यासाठी टर्मिनल्सनी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त केले आहे. तथापि, पुरेशा प्रमाणात चालक उपलब्ध नसल्याने टर्मिनल्सवर येणाऱ्या ट्रेलरची संख्या कमी झाली असल्याचेही जेएनपीएने स्पष्ट केले आहे.
कंटेनर्समधील माल उतरविण्याचे काम सुरळितपणे पार पडावे यासाठी, जेएनपीए सक्रियपणे पुढाकार घेऊन अनेक उपाययोजना करत आहे. रेल्वेमार्गाच्या जवळ असलेल्या सीएफएसपर्यंत रेल्वेद्वारे कंटेनर्सच्या वाहतुकीची सोय करणे, जलद मंजुरीसाठी सीमाशुल्क अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे तसेच सध्या सुटीवर असलेल्या चालकांना परत येण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधून विशेष गाड्यांची व्यवस्था करून व्यापाराला मदत करणे अशा उपायांचा यामध्ये समावेश आहे.
जेएनपीएची एकूण कंटेनर साठवण क्षमता 1.76 लाख टीईयू आहे. सामान्य परिस्थितीत, कंटेनरची ऑक्युपन्सी 90,000 ते 1,00,000 टीईयूच्या दरम्यान असते. पश्चिम आशियातील भू-राजकीय अशांततेमुळे ट्रान्सशिपमेंट कार्गोमध्ये वाढ झाल्याने, 7 मे 2026 रोजी कंटेनर व्याप्तीचे प्रमाण 1.18 लाख टीईयू असून ते एकूण साठवण क्षमतेच्या सुमारे 67 टक्के आहे. एकूण ऑक्युपन्सीपैकी, केवळ 26,000 टीईयू हे ट्रान्सशिपमेंट कंटेनर आहेत, पण त्यामुळे दाटीवाटी होत नाही. सीएफएस आणि सीबी कडून ट्रेलरची व्यवस्था करण्यात होत असलेला विलंब हे कंटेनरची एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्युपन्सी वाढण्याचे एकमेव कारण आहे.
बंदरातील कामकाज नेहेमीप्रमाणेच आणि कोणत्याही प्रकारे गर्दी न होता सुरू आहे. तथापि, सीएफएस आणि सीमाशुल्क ब्रोकर्स कंटेनर्स बाहेर काढण्यासाठी तातडीने पुरेशा प्रमाणात ट्रेलर आणि चालकांची जोपर्यंत व्यवस्था करणार नाहीत तोपर्यंत आयात केलेल्या मालाचे कंटेनर्स खोळंबून राहण्याची समस्या दूर होणार नाही याचा जेएनपीएने पुनरुच्चार केला आहे.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai