युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
"फिट इंडिया हिट इंडिया" मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात वस्तू आणि सेवा कर तसेच सीमाशुल्क विभागाच्या हौशी संघाने 'मुंबई हिरोज' संघाचा पराभव करत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असलेली प्रतिभा दाखवली
प्रविष्टि तिथि:
04 MAY 2026 8:49PM by PIB Mumbai
मुंबई, 4 मे 2026
भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि 'फिट इंडिया मोहीम' यांनी रविवारी वाकोला येथील एअर इंडिया मैदानावर "फिट इंडिया हिट इंडिया" या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, व्यायामप्रेमी आणि क्रीडाप्रेमी एकत्र आले. ही संध्याकाळ शारिरीक तंदुरुस्ती, सक्रिय जीवनशैली आणि सामुदायिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित होती.

मुंबईतील उत्साही जनसमुदायाच्या साक्षीने पार पडलेल्या या मैत्रीपूर्ण सामन्यात वस्तू आणि सेवा कर तसेच सीमाशुल्क विभागाच्या हौशी संघाने 'मुंबई हिरोज' संघाशी लढत दिली. भारत सरकारच्या 'फिट इंडिया मोहीम' उपक्रमांतर्गत आयोजित या सामन्याचा मुख्य उद्देश, क्रीडा आणि सक्रिय जीवनशैलीच्या माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याला चालना देणे हा होता.
मुंबईच्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त प्राची सरूप या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर मुंबईच्या सीमाशुल्क विभागाचे मुख्य आयुक्त बी.बी. गुप्ता हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती राहिले.
"फिट इंडिया हिट इंडिया" सारखे उपक्रम नागरिकांमध्ये शारिरीक तंदुरुस्ती आणि स्वास्थ्याची संस्कृती रुजवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात." असे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे आयुक्त पंकज सिंह यांनी सांगितले.
मुंबई हिरोज संघामध्ये सुनील शेट्टी, सोहेल खान, शरद केळकर, शब्बीर अहलुवालिया आणि फ्रेडी दारूवाला यांच्यासह अनेक अभिनेते, गायक आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर यांच्यासारख्या अनेक नामवंतांचा समावेश होता जे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी एकत्र आले होते.
इतर उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये सुदेश भोसले, गुलशन ग्रोव्हर, करसन घावरी (माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी आमदार), विश्वास नांगरे पाटील (आयपीएस अधिकारी), कृष्णा हेगडे (माजी आमदार) आणि नदीम मेमन (एमसीए क्युरेटर) यांचा समावेश होता.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत, जीएसटी अँड कस्टम्स अमेच्युअर संघाने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 170 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
171 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, पहिल्याच षटकात सोहेल खान केवळ एक धाव करून बाद झाल्याने मुंबई हिरोजला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. अखेरीस मुंबई हिरोजचा डाव 20 षटकांत 9 बाद 131 या धावसंख्येवर मर्यादित राहिला आणि जीएसटी अँड कस्टम्स ऍमेच्युअर संघाने 39 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
सामन्यानंतर बोलताना मुंबई हिरोजचा कर्णधार सुनील शेट्टी म्हणाला, "आम्ही अनेक सामने खेळलो आहोत आणि खूप कमी सामने हरलो आहोत. जॅकी दादांनी दोन्ही संघांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल, तसेच गुलशन ग्रोव्हर आणि दोन्ही संघांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो."
"फिट इंडिया हिट इंडिया" या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याने खेळाच्या माध्यमातून एकजूट साधण्याच्या शक्तीला पुन्हा एकदा अधोरेखित केले. तसेच क्रिकेट आणि मनोरंजनाच्या एका आनंददायी रजनीद्वारे तंदुरुस्ती, सांघिक कार्य आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश अधिक दृढ केला.
निलीमा चितळे/सुषमा काणे/संदेश नाईक/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2257925)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English