अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या 5 व 6 क्रमांकाच्या संचांमध्ये (Units) प्रमुख उपकरणांच्या उभारणीसाठी अणुऊर्जा नियामक मंडळाची परवानगी

Posted On: 01 MAY 2026 7:46PM by PIB Mumbai

 

अणुऊर्जा नियामक मंडळाने (AERB) 30 एप्रिल 2026 रोजी कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 5 आणि 6 क्रमांकाच्या संचांमध्ये मुख्य उपकरणांच्या उभारणीसाठी रीतसर परवानगी दिली आहे.

या परवानगीमुळे आता भारतीय अणुऊर्जा महामंडळाला प्रकल्पातील महत्त्वाच्या यंत्रसामग्रीची उभारणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने रिॲक्टर प्रेशर व्हेसल, स्टीम जनरेटर्स आणि कुलंट पंप्स यांसारख्या प्रमुख उपकरणांच्या स्थापनेचा समावेश आहे.

अणुऊर्जा नियामक मंडळाने (AERB) विहित केलेल्या सुरक्षा मानकांनुसार या युनिट्सच्या आराखड्याची बहुस्तरीय सुरक्षा तपासणी केल्यानंतर आणि एप्रिल 2021 मध्ये 'काँक्रीटच्या पहिल्या थरासाठी'दिलेल्या परवानगीनंतर आतापर्यंत झालेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन ही मंजुरी देण्यात आली आहे.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या (KKNPP) या युनिट्समध्ये अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही वैशिष्ट्ये AERB च्या 'लाइट वॉटर रिॲक्टर' आधारित अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षा संहितेनुसार असून, ती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) अद्ययावत सुरक्षा मानकांशी सुसंगत आहेत.

तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात स्थित कुडनकुलम प्रकल्पात, रशियन फेडरेशनच्या तांत्रिक सहकार्याने VVER आराखड्यावर आधारित प्रत्येकी 1000 मेगावॅट क्षमतेचे सहा 'प्रेशराईज्ड वॉटर रिॲक्टर्स' उभारले जात आहेत. यातील पहिली दोन युनिट्स (युनिट 1 आणि 2) 20132015 सालापासून कार्यान्वित आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या युनिटचे (KKNPP- 3 आणि 4) बांधकाम सध्या प्रगत टप्प्यावर असून, या युनिट्समधील मुख्य यंत्रसामग्रीच्या उभारणीसाठी अणुऊर्जा नियामक मंडळाने (AERB) यापूर्वीच परवानगी दिलेली आहे.

***

शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2257406) अभ्यागत कक्ष : 18
Read this releasein: English