संरक्षण मंत्रालय
एनसीसी महाराष्ट्र चे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी नागपूर येथे घेतली नितीन गडकरी यांची भेट
Posted On:
01 MAY 2026 7:36PM by PIB Mumbai
नागपूर, 1 मे 2026
महाराष्ट्र एनसीसी (राष्ट्रीय छात्र सेना) महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी, नागपूरच्या आपल्या पाहणी व आढावा दौऱ्यादरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रामुख्याने गडचिरोली आणि चंद्रपूर यांसारख्या विदर्भातील दुर्गम भागांमध्ये एनसीसीचा विस्तार करण्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मेजर जनरल त्यागी यांनी गडकरी यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी रस्ते सुरक्षा जनजागृती, व्यसनमुक्ती मोहीम आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांमधील एनसीसी कॅडेट्सच्या योगदानावर प्रकाश टाकला; जे 'विकसित भारत' या संकल्पनेला बळकटी देणारे आहे. तसेच, नागपूर येथील प्रस्तावित राज्य अकादमीसह मुंबई आणि कोल्हापूरमधील एनसीसीच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी सहकार्य व पाठबळ देण्याची विनंती केली.
विदर्भातील कॅडेट्ससाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा विषयातील प्रगत प्रशिक्षण सुरू करताना येणाऱ्या अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले, तसेच नागपूरच्या फुटाळा तलावावरील एनसीसी नौदल युनिटला आवश्यक प्रशिक्षण सहकार्य देण्याची विनंती केली. नागपूर एनसीसी गटामध्ये सैन्यदलाच्या तिन्ही शाखांसह 'आरव्हीसी' युनिटद्वारे अश्वारोहणाचे विशेष प्रशिक्षण दिले जाते; त्यामुळे प्रशिक्षण आणि साहसी उपक्रम अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी येथील पायाभूत सोयी-सुविधांचे तातडीने आधुनिकीकरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
युवा सक्षमीकरणातील एनसीसीच्या भूमिकेचे मंत्री गडकरी यांनी कौतुक केले. पायाभूत सुविधांचा विकास, संघटनेचा विस्तार, महिला सक्षमीकरण आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी भागीदारी या विषयात त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच यासंदर्भातील पुढील कार्यवाहीसाठी सविस्तर प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.
या बैठकीला ग्रुप कॅप्टन कुशल व्यास आणि लेफ्टनंट कर्नल अमेय कानडे उपस्थित होते. या भेटीपूर्वी, अतिरिक्त महासंचालकांनी कामठी येथील एनसीसीच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीला भेट देऊन तेथील प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा घेतला.

***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2257405)
अभ्यागत कक्ष : 32