ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी झालेल्या पुरवणी करारावर स्वाक्षरी
Posted On:
29 APR 2026 7:57PM by PIB Mumbai
मुंबई, 29 एप्रिल 2026
एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ आणि महाराष्ट्र सरकारने उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी केलेल्या सामंजस्य कराराच्या पुरवणी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. देशाची स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
एकूण 1800 मेगावॉटची क्षमता अभिप्रेत असलेल्या अंबा आणि कुंभे या दोन उदंचन जलविद्युत प्रकल्पांच्या विकासासाठी 03 सप्टेंबर 2024 रोजी मूळ सामंजस्य करार करण्यात आला होता. भूरचना, जलाशयाची क्षमता आणि प्रकल्पाची व्यवहार्यता या बाबींचा विचार करून करण्यात आलेले सविस्तर सर्वेक्षण, इष्टतमीकरण अभ्यास आणि तांत्रिक मूल्यमापन यांच्या आधारे, आता या प्रकल्पांची क्षमता आणि स्थाने यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

पुरवणी करारानुसार अंबा उदंचन जलविद्युत केंद्राची क्षमता 800 मेगावॉटवरून वाढवून 1500 मेगावॉट करण्यात आली आहे. तर कुंभे उदंचन जलविद्युत प्रकल्पाची क्षमता 1000 मेगावॉटवरून 1100 मेगावॉट करण्यात आली आहे. यामुळे एकूण वीजनिर्मिती क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. या सुधारणांचा उद्देश संसाधनांचा इष्टतम वापर आणि प्रकल्पाची व्यवहार्यता सुधारणे, हा आहे.
हा पुरवणी करार, मूळ सामंजस्य करारात प्रकल्पाचे सुधारित निकष समाविष्ट करून या बदलांना औपचारिक स्वरूप देताना इतर सर्व अटी आणि शर्ती मात्र अपरिवर्तित ठेवते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण विकास पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, तसेच महाराष्ट्र शासन आणि एनटीपीसीमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एनटीपीसी आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील सहयोग, स्वच्छ ऊर्जा उपक्रमांना गती देण्याच्या आणि देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याची त्यांची सामायिक वचनबद्धता अधोरेखित करतो.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2256712)
अभ्यागत कक्ष : 34