संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरडीओने अहिल्यानगरमधील व्हीआरडीई इथे स्वदेशी प्रगत आर्मर्ड म्हणजेच बख्तरबंद प्लॅटफॉर्मचे केले अनावरण


डीआरडीओचे प्रमुख डॉ. एस. व्ही. कामत यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे अत्याधुनिक बख्तरबंद प्लॅटफॉर्म झाला कार्यान्वित

Posted On: 25 APR 2026 9:58PM by PIB Mumbai

मुंबई, 25 एप्रिल 2026

 

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) एक प्रमुख संशोधन संस्था असलेल्या वाहन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान’ने (Vehicles Research & Development Establishment) आरेखित आणि विकसित केलेल्या “प्रगत आर्मर्ड म्हणजेच बख्तरबंद प्लॅटफॉर्मला (ट्रॅक आणि चाके असलेले)” 25 एप्रिल 2026 रोजी अहिल्यानगरमधील व्हीआरडीई येथे आयोजित एका कार्यक्रमात डीआरडीओ( संशोधन आणि विकास) सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. व्ही. कामत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

हा अत्याधुनिक बख्तरबंद प्लॅटफॉर्म (ट्रॅक आणि चाके असलेले) भारतीय सशस्त्र दलांच्या नवनव्या  कार्यात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. लष्करी लढाऊ वाहने (Infantry Combat Vehicle) आणि बख्तरबंद कर्मचारी वाहक (Armoured Personnel Carrierम्हणून उपयुक्त आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये स्वदेशात विकसित 30 मिमी क्रूलेस टॉवर समाविष्ट करण्यात आले आहे. या वाहनांमध्ये वाहतूक, अग्निशक्ती आणि संरक्षण क्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. उच्च क्षमतेची इंजिन्स आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज असल्यामुळे, या वाहनांना उच्च पॉवर-टू-वेट गुणोत्तर, अधिक गती क्षमता, चढ-उतार आणि अडथळे पार करण्याची क्षमता, STANAG स्तर 4 आणि 5 चे संरक्षण, तसेच सर्व बाजूंनी मॉड्यूलर स्फोट आणि बॅलिस्टिक संरक्षण प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. ही वाहने पाण्यात आणि जमीनीवर (ॲम्फिबियन) दोन्ही ठिकाणी कार्यक्षम असून हायड्रो जेट्सच्या समावेशामुळे पाण्यातील अडथळे पार करण्याची त्यांची क्षमता सुधारली आहे. 30 मिमी क्रूलेस टरेट, 7.62 मिमी पीकेटी तोफ बसवण्यात आली असून रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे (Anti-Tank Guided Missiles) डागण्यासाठी देखील सोय करण्यात आली आहे.

या प्लॅटफॉर्मच्या मूलभूत डिझाइनमध्ये विविध लष्करी भूमिकांसाठी रुपांतर करण्याची क्षमता आहे. या वाहनांमध्ये 65% स्वदेशी सामग्री असून ती 90% पर्यंत वाढवण्याची योजना आहे.

या प्लॅटफॉर्म्सचे उत्पादन दोन औद्योगिक भागीदारांनी - मे. टीएएसएल, पुणे आणि मे. बीएफएल, पुणे यांनी विविध एमएसएमईंच्या (MSMEs) सहकार्याने केले आहे. या सहकार्यामुळे देशातील संरक्षण व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.

या कार्यक्रमाला प्रा. डॉ. प्रतीक किशोर, डीएस आणि डीजी एसीई, डॉ. चंद्रिका कौशिक, डीएस आणि डीजी (पीसी आणि एसआय), मे. टीएएसएल पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुक्रन सिंग, बीएफएलचे  व्हीसी आणि जेटी एमडी अमित कल्याणी तसेच उद्योग क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हीआरडीई चे ओएस आणि संचालक जी आर एम राव यांनी या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये आणि क्षमतांबद्दल माहिती दिली. एआरडीई, डीएमआरएल, एचईएमआरएल, सीव्हीआरडीई, आर अँड डीई (ई) यांसारख्या विविध प्रयोगशाळांचे संचालक आणि शास्त्रज्ञ देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2255582) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English