अर्थ मंत्रालय
जागतिक स्तरावर मोठे होताना स्थानिक गरजांकडे लक्ष दिले, तरच खरी प्रगती होईल: निर्मला सीतारामन
व्यवहारातील मानवी भाव तर हरपत नाही ना याचीही काळजी घ्यायला हवी
प्रविष्टि तिथि:
24 APR 2026 3:42PM by PIB Mumbai
पुणे, 24 एप्रिल 2026
बँकांनी मोठे होताना ग्राहकांच्या जवळ राहणे महत्त्वाचे आहे. जागतिक स्तरावर वाढ करताना स्थानिक गरजांकडे लक्ष दिले, तरच खरी प्रगती होईल, असे विचार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यात मांडले.
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या महाराष्ट्र प्रदेशाच्या स्थानिक मुख्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहण्याचे एक मोठे कारण आपल्या देशातला स्वतःचा मोठा बाजार आहे. आपल्याकडचा खप खूप मोठा आहे. निर्यात महत्वाची असून त्यामधून पैसा आणि मूल्य येते, असे सांगताना त्या म्हणाल्या, सध्या जागतिक परिस्थिती थोडी अवघड आहे, त्यामुळे निर्यातीला फटका बसतोय, पण आपले निर्यातदार नवीन बाजार शोधून काम चालू ठेवत आहेत—हे खूप कौतुकास्पद आहे.
पण आपली देशांतर्गत अर्थव्यवस्था—शेती, उद्योग, सेवा क्षेत्र—हे सर्व मजबूत राहिले पाहिजे. शेतीला, उत्पादन-निर्मितीला, पर्यटनाला, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सतत व स्थिर आधार मिळाला, तरच आपली ही वाढ टिकून राहील, आणि यात बँकांची भूमिका खूप मोठी आहे, हे त्यांनी याप्रसंगी अधोरेखित केले.


“विकसित भारत 2047” साठी बँका कशा तयार व्हायला हव्यात व यासाठी एक समिती बनवण्याची घोषणा झाली आहे. भविष्यातल्या गरजांनुसार बँकिंग सिस्टम बदलायला लागेल; पुण्यात स्थानिक मुख्यालय सुरू करून स्टेट बँक ऑफ इंडियाने याचे एक चांगले उदाहरण दिले आहे. यामुळे ग्राहकांच्या जवळ जाऊन काम करता येईल. महाराष्ट्र मोठे राज्य आहे—आर्थिकदृष्ट्याही मजबूत आहे—म्हणून असा निर्णय खूप उपयोगी आहे. मोठी बँक असूनही SBIने आपली लवचिकता टिकवून ठेवली आहे, असे सांगत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात प्रत्यक्ष संवादाचे व संबंधांचे महत्त्व अधोरेखित करताना त्या म्हणाल्या, आता डिजिटल बँकिंग खूप वाढले आहे, पण डिजिटलसोबत प्रत्यक्ष मानवी संवाद पण तितकाच गरजेचा आहे. AI सारखे तंत्रज्ञान वापरणे गरजेचे आहे.
आता पुढे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी फक्त ठराविक क्षेत्र— जसे ऊस, IT, startups—यापुरते मर्यादित न राहता, समोर न आलेले, दुर्लक्षित क्षेत्र समजून घ्यायला हवेत, असे आवाहन सीतारामन यांनी याप्रसंगी केले. महाराष्ट्रात खूप MSME clusters आहेत—पारंपरिक उद्योग आहेत—ज्यांना अद्ययावत करण्याची गरज आहे. सरकारनेही यासाठी घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या पूर्व व आग्नेय भागात छोटे उद्योग—जसे की विणकाम, तेल काढण्याचे उद्योग—हे सगळे आहेत, त्यांना आधार देणे खूप आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

पुण्यामधील खराडी एमआयडीसी भागात उभ्या राहिलेल्या या मुख्यालयातून मुंबई व राज्याचा किनारी प्रदेश सोडून उर्वरित जिल्ह्यांसाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे कामकाज चालेल. या उद्घाटनप्रसंगी मेधा कुलकर्णी, खासदार, राज्यसभा, एम. नागराजू, सचिव, वित्तीय सेवा विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार व चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी, अध्यक्ष, स्टेट बँक ऑफ इंडिया हे देखील उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या या नवीन इमारतीची प्रतिमा असलेले टपाल तिकीट टपाल विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध संस्थांना मोठ्या देणग्या देखील आल्या.

* * *
पीआयबी पुणे | शिल्पा नीलकंठ/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2255277)
आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English