शिक्षण मंत्रालय
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेअंतर्गतच्या कौशल्य शिक्षण विभागाचा पदवी प्रदान समारंभ संपन्न
Posted On:
23 APR 2026 9:42PM by PIB Mumbai
मुंबई, 23 एप्रिल 2026
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेअंतर्गतच्या (TISS) कौशल्य शिक्षण विभागाचा (School of Skill Education) पदवी प्रदान समारंभ आज 23 एप्रिल 2026 रोजी मुंबईतील मालती आणि ए.डी. जल नवरोजी संकुलातील बहुद्देशीय केंद्रात पार पडला.
या समारंभाला महाराष्ट्र राज्य सरकारचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. आपल्या संबोधनातून त्यांनी कौशल्य भारतातून समृद्ध भारत या संकल्पाला अनुसरून, देशातील युवा वर्गाचे सक्षमीकरण करण्याच्या, उद्योजकतेला चालना देण्याच्या तसेच भारताच्या प्रगतीला गती देण्याच्या प्रक्रियेत, कौशल्य शिक्षणाची असलेली परिवर्तनीय क्षमता अधोरेखित केली. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या कौशल्य विषयक पदवी अभ्यासक्रमांचे वेगळेपणही त्यांनी नमूद केले. या पदवी अभ्यासक्रमांना कठोर शैक्षणिक शिस्त आणि प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाच्या मिलाफाची भक्कम जोड असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यामुळे कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेणारे, रोजगारासाठी सज्ज आणि वास्तव जगतातील गरजांना प्रतिसाद देणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांची जडणघडण होत असल्याचे ते म्हणाले.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे कुलगुरू बद्री नारायण तिवारी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, तसेच भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज व्यावसायिक तज्ञ घडवण्यासाठी उद्योगाभिमुख, कौशल्याधारित शिक्षणाचे वाढते महत्त्वही अधोरेखित केले.
या पदवी प्रदान समारंभाला टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता (शैक्षणिक कामकाज) आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हा समारंभ विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा यशदायी टप्पा ठरला. या समारंभाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांची समर्पणवृत्ती, चिकाटी तसेच देशाचे मनुष्यबळ आणि समाजव्यवस्था या दोन्ही क्षेत्रात स्वतःचे अर्थपूर्ण योगदान देण्यासाठीच्या त्यांच्या सज्जतेचा गौरव केला गेला.
या निमित्ताने सर्वसमावेशक, परिणामकारक आणि उद्योग जगताशी संलग्न कौशल्य शिक्षण देण्यासाठी कायम वचनबद्ध असलेल्या शिक्षकवर्ग, शैक्षणिक समन्वयक तसेच औद्योगिक क्षेत्रातल्या भागीदारांच्या योगदानाचीही कृतज्ञपूर्वक दखल घेतली गेली.

* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2255040)
अभ्यागत कक्ष : 17