सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Posted On: 21 APR 2026 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2026

दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या भारत दौऱ्यादरम्यान सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने 20 एप्रिल 2026 रोजी एमएसएमई क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने कोरियाच्या एसएमई आणि स्टार्टअप्स मंत्रालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

हा सामंजस्य करार दोन्ही मंत्रालयांमध्ये सहकार्यासाठी एक संरचित चौकट स्थापित करतो, ज्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर सातत्यपूर्ण संवाद साधता येतो आणि परस्पर फायदेशीर संधींचा शोध सुलभ होतो. याचा उद्देश एकमेकांच्या एम एस एम ई परिसंस्थांना अधिक सखोलपणे समजून घेणे आणि संबंधित घटकांमधील सहभाग वाढवणे हा आहे.

माहिती आणि तज्ञांची देवाणघेवाण, सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान, व्यावसायिक जुळवणी आणि तांत्रिक व आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. तसेच, हा करार दोन्ही देशांमधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठीच्या संयुक्त उपक्रमांनाही पाठिंबा देतो.

ही भागीदारी म्हणजे भारत-कोरिया आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून सर्वसमावेशक विकास, नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीचे प्रमुख चालक म्हणून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर भर  देते.


सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर‍

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2254342) अभ्यागत कक्ष : 9