कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सीबीआयने फसवणुकीच्या प्रकरणात केली अटक

प्रविष्टि तिथि: 20 APR 2026 8:43PM by PIB Mumbai

मुंबई, 20 एप्रिल 2026

 

केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच, आर कॉम कंपनीचे दोन वरिष्ठ अधिकारी - डी. विश्वनाथ आणि अनिल कालिया - यांना अटक केली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड, अनिल अंबानी आणि इतर काही अज्ञात व्यक्तींविरुद्ध नियमित गुन्हा दाखल केला होता. बँकेने आरोपी कंपनीला पतपुरवठा (क्रेडिट सुविधा) मंजूर केली होती, परंतु आरोपी कर्जदारांनी केलेल्या फसवणुकीमुळे बँकेला सुमारे 2,929,05 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले, असा आरोप एसबीआयच्या तक्रारीत करण्यात आला होता. एसबीआयने  दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 17 सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांना एफआयएस ना एकूण 19,694.33 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आतापर्यंतच्या तपासात असे निष्पन्न झाले आहे की, आरकॉम लिमिटेडने कंपनीच्याच अधिकाऱ्यांच्या मार्फेत बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आडवळणाने गुंतागुंतीचे आणि अप्रत्यक्ष व्यवहार केले. तसेच, आपल्याच समूहातील इतर कंपन्यांशी संबंधित बनावट सवलतीवर आधारित पतपत्रे (Letters of Credit) उघडली; मात्र या पतपत्रांचा भूर्दंड अंतिमतः बँकेलाच बसला. त्यामुळे बँकांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले.

आरकॉमचे सह-अध्यक्ष असलेले डी. विश्वनाथ यांच्याकडे संपूर्ण समूहाच्या बँकिंग कामकाजाची समग्र जबाबदारी होती आणि त्यांच्याच निर्देशांनुसार निधीचा गैरवापर करण्यात आला. आरोपी कंपनीला पतपुरवठा सुविधा मंजूर करून त्या वितरित करण्याच्या प्रक्रियेत ते बँकांशी समन्वय साधण्याचे काम करत होते. उपाध्यक्ष असलेल्या अनिल कालिया यांनी डी. विश्वनाथ यांना या कामात सक्रिय साथ दिली होती. हे दोन्ही अधिकारी आरकॉम  समूहाचे अत्यंत महत्त्वाचे पदाधिकारी होते आणि ते कॉर्पोरेट वित्त, बँकिंग कामकाज, देयके/निधीचा वापर इत्यादी बाबींचे व्यवस्थापन पाहत होते. त्यांना संबंधित अधिकारक्षेत्र असलेल्या न्यायालयासमोर हजर केले जाणार असून या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

इथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की, गेल्या काही महिन्यांत सीबीआयने विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ एलआयसीने दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे, अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाविरुद्ध सात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत.

 

* * *

पीआयबी मुंबई | राधिका अघोर/राजेश शिरभाते/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2253953) आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English