महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महिलांसबंधित केलेले वार्तांकन नेहमीच संवेदनशील जबाबदार आणि अचूक असावे - विजया रहाटकर

Posted On: 20 APR 2026 6:33PM by PIB Mumbai

मुंबई, 20 एप्रिल 2026

 

माध्यमांनी महिलांशी संबंधित विषय हाताळताना संवेदनशीलता, जबाबदारी आणि अचूकता राखणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. माध्यमे ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून समाजाची विचारसरणी घडवणारी प्रभावी शक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्या राष्ट्रीय महिला आयोग आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित “महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान” या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या.

यावेळी माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता, लेखिका रिचा सूद आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विजया रहाटकर यांनी सांगितले की, महिलांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, प्रशासन आणि उद्योजकता यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली असली तरी त्यांच्या समोरील आव्हाने अद्याप कायम आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरते.

डिजिटल युगात बातम्यांचा वेग वाढला असला तरी पडताळणीशिवाय माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढल्याचे त्यांनी नमूद केले. “बातमी लवकर देणे महत्त्वाचे असले तरी तिची विश्वासार्हता त्याहून अधिक महत्त्वाची आहे,” असे त्या म्हणाल्या. फेक न्यूज आणि दिशाभूल रोखण्यासाठी तथ्य-तपासणीला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

“कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि पत्रकारितेवरील त्याचा परिणाम” या विषयावर बोलताना ब्रिजेश सिंह, महासंचालक तथा प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी सांगितले की, शहरी भाग वगळता अजूनही महिलांकडून एआय साधनांचा वापर मर्यादित प्रमाणात होत आहे. परिणामी, समाजातील विद्यमान स्त्री-पुरुष विषमता एआयमध्येही प्रतिबिंबित होताना दिसते. त्यामुळे एआय संदर्भातील धोरणनिर्मिती करताना लिंग-संवेदनशील दृष्टिकोन ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

लिंग-संवेदनशील वृत्तांकन हा पर्याय नसून प्रत्येक पत्रकाराची व्यावसायिक जबाबदारी आहे, असे लेखिका रिचा सूद यांनी नमूद केले. महिलांविषयीच्या अत्याचारांच्या बातम्यांऐवजी सकारात्मक बातम्या पहिल्या पानावर छापल्या जाव्यात असे मत त्यांनी व्यक्त केले. माध्यमांनी महिलांचे प्रश्न केवळ गुन्हेगारी घटनांपुरते मर्यादित न ठेवता सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले.

महिलांविरोधातील गुन्ह्यांचे वार्तांकन करताना सुयोग्य भाषेचा वापर, पीडितेचा सन्मान आणि ओळख संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असावे, असे वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय महिला आयोग माध्यमांना सामाजिक परिवर्तनाचे भागीदार मानत असून संवाद आणि सहकार्याच्या माध्यमातून व्यापक बदल घडवण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेला मुंबईतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2253889) अभ्यागत कक्ष : 38
Read this releasein: English