अर्थ मंत्रालय
ब्रिक्स युवा कर व्यावसायिकांसाठी नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (एनएडीटी) क्षमता उभारणी कार्यशाळेचा प्रारंभ
Posted On:
20 APR 2026 4:00PM by PIB Mumbai
नागपूर, 20 एप्रिल 2026
ब्रिक्स युवा कर व्यावसायिकांच्या कार्यगटाच्या क्षमता उभारणी कार्यशाळेची नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये आज म्हणजेच, 20 एप्रिल 2026 रोजी सुरुवात झाली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदांतर्गत 2026 या वर्षातला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
TDD8.jpeg)
20 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत चालणाऱ्या या आठवडाभराच्या कार्यशाळेत भारतासह विविध ब्रिक्स सदस्य राष्ट्रांतील प्रतिनिधी एकत्र आले आहेत. यामुळे कर आकारणीच्या क्षेत्रातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाढते सहकार्य आणि सहभाग प्रतिबिंबित होत आहे. या कार्यशाळेत ब्राझील (3), रशिया (4), चीन (3), दक्षिण आफ्रिका (2), युएई (2), इथिओपिया (2) आणि भारत (6) येथील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) सदस्य (विधी), प्रसेनजित सिंह या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी वाढत्या कर आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि पारदर्शक, न्याय्य व लवचिक जागतिक कर प्रणाली घडवण्यासाठी तरुण कर व्यावसायिकांच्या भूमिकेवर भर दिला. 'राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी' (एनएडीटी) च्या महासंचालकांनी (प्रशिक्षण) पाच दिवसांच्या या अभ्यासक्रमाची रुपरेषा सादर केली, ज्यामध्ये नव्याने उदयाला येत असलेल्या विविध विषयांसह 'टॅक्स फोरम्स'च्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे.

भारताच्या 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, "लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी" या संकल्पनेवर आधारित आणि पंतप्रधानांच्या सर्वसमावेशक, लोककेंद्री जागतिक भागीदारीच्या दृष्टीकोनाशी सुसंगत ही कार्यशाळा आयोजित केली जात आहे. आंतरराष्ट्रीय करप्रणालीमध्ये हस्तांतरण मूल्यनिश्चिती आणि सीमापार कर संरचनेसह जागतिक दृष्टिकोन आणि तांत्रिक कौशल्यांमध्ये सहभागींना पारंगत करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
यातील मुख्य चर्चेमध्ये बीईपीएस उपक्रम, ओईसीडी आणि संयुक्त राष्ट्रांचे आदर्श कर प्रस्ताव, 'पिलर वन' आणि 'पिलर टू' सारख्या जागतिक कर सुधारणा आणि एपीए (APA) व मॅप (MAP) सारख्या विवाद निवारण यंत्रणांचा समावेश आहे. या कार्यक्रमात ब्रिक्स टॅक्स फोरमच्या चर्चेचाही समावेश असून, संवाद वाढवणे, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि सहकार्य दृढ करणे यावर भर दिला जात आहे. यामुळे क्षमता बांधणी आणि अधिक न्याय्य जागतिक कर व्यवस्थेप्रती भारताची वचनबद्धता अधोरेखित होत आहे.

* * *
पीआयबी मुंबई | राधिका अघोर/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2253769)
अभ्यागत कक्ष : 62