माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र शोकसंवेदना व्यक्त
Posted On:
13 APR 2026 9:00PM by PIB Mumbai
मुंबई, 13 एप्रिल 2026
ज्येष्ठ आणि चतुरस्त्र गायिका आशा भोसले, यांच्या पार्थिवावर, आज दुपारी मुंबईत, शिवाजी पार्क इथे, शासकीय इतमामात अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल म्हणजेच 12 एप्रिल 2026 रोजी, वयाच्या 92 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झालं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह, संगीत विश्वासह, समाजाच्या इतर क्षेत्रातील देशविदेशातल्या नामवंत, मान्यवर व्यक्तींनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
त्यांच्या निधनामुळे, संगीत विश्वातील एका युगाचा अंत झाल्याची भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा आवाज लाखो लोकांच्या हृदयात अजरामर असेल, असेही राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत, त्यांच्या जाण्याने, संगीत विश्वात, कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, असे म्हटले आहे. भारतातील अत्यंत मोजक्या चतुरस्र गायिकांपैकी त्या एक होत्या, अशा शब्दांत, त्यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त करत, भारताच्या सांस्कृतिक विश्वाची ही खूप मोठी हानी असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी, आज आशा भोसले यांच्या निवासस्थानी, त्यांच्या पार्थिवाचे अन्त्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत, श्रद्धांजली वाहिली.
आशा भोसले यांच्या निधनामुळे भारतीय संगीतविश्वाची मोठी हानी झाली आहे, अशी भावना, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अतुलनीय होते, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आशा भोसले यांना भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुल्य योगदानासाठी पद्म विभूषण(2008), दादासाहेब फाळके पुरस्कार (2000) यांसह अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. देशाच्या संगीतक्षेत्राच्या वारशातील अत्यंत उमदा, प्रतिष्ठित आणि प्रतिभावान आवाजांपैकी एक म्हणून त्या ओळखल्या जातात.



2008 साली नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा देविसिंह पाटील, यांनी आशा भोसले यांना पद्म विभूषण सन्मान प्रदान केला होता. (File Photo – PIB)

तसेच, 20 नोव्हेंबर 2013 रोजी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2013 च्या उद्घाटन समारंभात त्यांनी भाषण केले होते. (File Photo – PIB)

18 ऑगस्ट 2016 रोजी अरुणाचल प्रदेशातील बोमडिला येथे त्यांनी एका जवानाला राखी बांधली होती, ज्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजु देखील उपस्थित होते. (File Photo – PIB)
आशा भोसले या भारतीय चित्रपट-संगीत सृष्टीतील सर्वात बहुआयामी, चतुसस्त्र पार्श्वगायिकांपैकी एक होत्या. अनेक दशकांच्या आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये हजारो गीते सादर केली आहेत.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/राधिका अघोर/दर्शना राणे
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2251708)
अभ्यागत कक्ष : 55