नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुरगाव बंदर प्राधिकरणाची सर्व प्रमुख बंदरांमध्ये सर्वाधिक वृद्धी; आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये मालवाहतुकीत पाच वर्षांतील उच्चांक गाठला

Posted On: 11 APR 2026 5:42PM by PIB Mumbai

 

बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या मुरगाव बंदर प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतातील सर्व प्रमुख बंदरांमध्ये सर्वाधिक विकास दर साध्य करत, या बंदराने गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक मालवाहतूक करण्याची नोंद केली आहे.

मुरगांव बंदर प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2025–26 दरम्यान 21.01 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळली असून, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 16 टक्के वृद्धी नोंदवली आहे. देशातील 12 प्रमुख बंदरांमधून हा विकास दर सर्वाधिक आहे. बंदराची ही कामगिरी प्रमुख बंदरांच्या एकूण वृद्धीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. सर्व प्रमुख बंदरांनी एकत्रितपणे आर्थिक वर्ष 2024–25 मधील 854 दशलक्ष मेट्रिक टनाच्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये 915 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक हाताळली असून, ही वाढ 7.14 टक्के इतकी आहे.

मालवाहतुकीतील ही वाढ विविध क्षेत्रांमधील सुधारित कामगिरीमुळे झाली आहे. कोरडा माल कार्गोमध्ये 16.73 टक्के वाढ झाली असून, इतर विविध मालवाहतुकीत 34.56 टक्के इतकी वाढ झाली आहे. तयार खतांच्या वाहतुकीत 20.92 टक्के वाढ झाली. लोहखनिज (पॅलेट्ससह) आणि द्रव मालामध्ये अनुक्रमे 1.83 टक्के आणि 1.22 टक्के वाढ नोंदवली गेली. ही वाढ मालवाहतुकीचे विविधीकरण आणि बंदराचे स्वरूप बळकट करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे द्योतक आहेत. आर्थिक आघाडीवर, मुरगाव बंदर प्राधिकरणाने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये 583 कोटी रुपयांचे परिचालन उत्पन्न नोंदवले आहे, जे गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च आहे.

या वर्षात, कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढवण्याच्या उद्देशाने बंदराने अनेक पायाभूत विकास प्रकल्प पूर्ण केले. यामध्ये 3 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करणे, रेल्वे लाईन क्रमांक 8 आणि 8 अ मध्ये सुधारणा करणे, धक्का क्रमांक 8 वर अग्निशमन प्रणाली बसवणे, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड कडून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी पाईपलाईन टाकणे आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी माध्यमातून धक्का 5 आणि 6 वर आच्छादित शेडचे बांधकाम करणे या कामांचा समावेश आहे.

मुरगाव बंदराची ही कामगिरी आधुनिकीकरण, कार्यात्मक कार्यक्षमता आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर असलेल्या सातत्यपूर्ण लक्ष्याला प्रतिबिंबित करते. हे बंदर येणाऱ्या वर्षांतही वाढ टिकवून ठेवेल आणि भारताच्या सागरी क्षेत्राच्या विकासात आपले योगदान देत राहील, अशी अपेक्षा आहे.

***

राधिका अघोर/राज दळेकर/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2251172) अभ्यागत कक्ष : 32
Read this releasein: English