नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

त्रेसष्टाव्या राष्ट्रीय सागरी दिनाची मुंबईत भव्य अंतिम सोहळ्याने सांगता


जलवाहतूक क्षेत्रातील अनेक भागधारक झाले सहभागी, उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानासाठी पुरस्कार वितरण

Posted On: 06 APR 2026 4:56PM by PIB Mumbai

मुंबई, 6 एप्रिल 2026

त्रेसष्टावा  राष्ट्रीय सागरी दिन सोहळा 2026 आणि मर्चंट नेव्ही सप्ताहाचा सांगता सोहळा मुंबईत अंधेरी येथील भारतरत्नम सभागृहात 5, एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता. "सागरी भारत, प्रगतीला बळ" अशी या सप्ताहाची संकल्पना होती.

सागरी क्षेत्राला असलेले राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समारंभपूर्वक 'लॅपेल पिन' लावून 'मर्चंट नेव्ही सप्ताहा'चा प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय  बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा सदिच्छा संदेश आणि याच विभागाचे राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांचा व्हिडिओ संदेश यामुळे या सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

महाराष्ट्र शासनाचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आर्थिक वृद्धी आणि राष्ट्रीय विकासाला चालना देण्यातील सागरी क्षेत्राच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. केंद्र सरकारचे माजी सचिव आणि नौवहन विभागाचे माजी महासंचालक दीपक शेट्टी, सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. सागरी क्षेत्राच्या विकासात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि अनुकरणीय कामगिरी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा तसेच सागरी क्षेत्रातील विशेष कौशल्य आणि नवोन्मेष यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने यावेळी विशेष सन्मानपत्रे प्रदान करण्यात आली.

मर्चंट नेव्ही सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित परिषदा, रक्तदान शिबिरे आणि जनजागृतीपर कार्यक्रम यांसारख्या राष्ट्रव्यापी उपक्रमांची सांगता देखील यानिमित्ताने झाली.  कार्यक्रमाच्या मध्यवर्ती संकल्पनेशी सुसंगत राहून, या कार्यक्रमाने व्यापार सुलभ करण्यात, आर्थिक विकासाला चालना देण्यात आणि भारताला एक अग्रगण्य सागरी राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्यात या क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.

नौवहन उपमहासंचालक आणि एनएमडीसी मध्यवर्ती समितीचे सदस्य सचिव  सुधीर कोहाकडे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला; यावेळी त्यांनी सर्व मान्यवर, सहभागी आणि संबंधित भागधारकांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलेल्या मौल्यवान योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाला महासंचालक (नौवहन) आयएएस  श्याम जगन्नाथन; अतिरिक्त महासंचालक (नौवहन) आयपीएस  सुशील मानसिंग खोपडे; तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष आणि  व्यवस्थापकीय संचालक बी. के. त्यागी  उपस्थित होते.


निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2249401) अभ्यागत कक्ष : 26
Read this releasein: English