विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
"आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघ" च्या नियुक्त- अध्यक्षांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची घेतली भेट; स्वदेशी बायोसिमिलर इन्सुलिन उत्पादन आणि मधुमेहाशी संबंधित स्वदेशी जैव-उत्पादनाच्या संधींबाबत केली चर्चा
जागतिक पुरवठ्याच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी इन्सुलिन उत्पादन वाढवण्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले समर्थन
भारताचे बायोटेक अभियान किफायतशीर मधुमेह उपकरणे आणि उद्योग सहकार्यावर केंद्रित : डॉ. जितेंद्र सिंह
केंद्रीय मंत्र्यांनी बायोसिमिलर इन्सुलिनची टंचाई अधोरेखित करत देशांतर्गत उत्पादनाला वाव असल्याचे केले नमूद
Posted On:
04 APR 2026 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2026
आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या (आयडीएफ) अध्यक्षपदी नियुक्त झालेल्या डॉ. नीती पाल सध्या भारत दौऱ्यावर असून आज त्यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. डॉ. सिंह हे वैद्यकशास्त्र आणि मधुमेह या विषयाचे प्रख्यात प्राध्यापक देखील आहेत. या भेटीत, इतर बाबींबरोबरच, स्वदेशी बायोसिमिलर इन्सुलिन उत्पादन तसेच मधुमेहाशी संबंधित स्वदेशी जैव-उत्पादनाच्या संधींबाबत चर्चा झाली.
या बैठकीत, इन्सुलिन उत्पादन, विशेषतः बायोसिमिलर इन्सुलिन आणि कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) उपकरणांच्या उत्पादनातील भारताची क्षमता बळकट करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या चर्चेत इन्सुलिनच्या भविष्यातील उपलब्धतेबाबत वाढत्या जागतिक चिंतांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. डॉ. पॉल यांनी प्रमुख बहुराष्ट्रीय उत्पादक GLP-1 औषधांसारख्या नवीन उपचार पद्धतींकडे वळत असल्यामुळे पुरवठ्यावर मर्यादा येऊ शकतात याकडे लक्ष वेधले. त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर इन्सुलिनचे उत्पादन सध्या काही मोजक्या कंपन्याच करत आहेत, ज्यामुळे पुरवठा साखळ्या असुरक्षित बनल्या आहेत आणि परवडणारे दर हे आव्हान बनले आहेत, विशेषतः टाईप1 मधुमेहाचे रुग्ण जे आयुष्यभर इन्सुलिन उपचारांवर अवलंबून आहेत.
या पार्श्वभूमीवर, कमी खर्चात तितकीच सुरक्षितता आणि परिणामकारकता देण्याच्या उद्देशाने तयार केलेले बायोसिमिलर इन्सुलिन हे प्रामुख्याने चर्चेच्या केंद्रस्थानी होते.
औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात भारताने आपले वर्चस्व निर्माण केले असले तरी, देशांतर्गत इन्सुलिन उत्पादन तुलनेने मर्यादित आहे, जे महत्त्वपूर्ण उणीवेसोबतच एक मोठी संधी असल्याकडे डॉ. जितेंद्र सिंह यांनी लक्ष वेधले.
जैवतंत्रज्ञान विभाग इन्सुलिन उत्पादन क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांना आधीपासूनच पाठिंबा देत आहे, ज्यामध्ये एका भारतीय कंपनीद्वारा उत्पादन वाढवण्यासाठी अलीकडेच केलेल्या उपाययोजनांचा समावेश आहे अशी माहिती डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली. भारतातील मधुमेह रुग्णांची मोठी संख्या लक्षात घेता इन्सुलिनची उपलब्धता वाढवणे ही एक राष्ट्रीय गरज आहे, तसेच विकसनशील देशांमधील वाढती मागणी लक्षात घेता ही एक जागतिक जबाबदारी देखील आहे यावर सिंह यांनी भर दिला.
आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देश परवडणाऱ्या मधुमेह उपचारांसाठी भारताकडे अधिकाधिक अपेक्षेने पाहत आहेत, हे डॉ. पाल यांनी अधोरेखित केले. किफायतशीर किंमतीत लस उपलब्ध करून देण्यात निभावलेल्या भूमिकेप्रमाणेच मधुमेह उपचार क्षेत्रातही भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे ते म्हणाले. अनेक प्रदेशांमध्ये इन्सुलिनच्या वाढलेल्या किमतींमुळे त्याची उपलब्धता मर्यादित होत आहे, ज्यामुळे कमी किमतीत दर्जेदार उत्पादने पुरवू शकणाऱ्या पर्यायी उत्पादन केंद्रांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या चर्चेत, कंटीन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) सिस्टीम आणि इन्सुलिन पंप यासारख्या मधुमेह उपचार तंत्रज्ञानाच्या व्यापक प्रणालीवरही चर्चा झाली. डॉ. पाल यांनी नमूद केले की, चीनसारख्या देशांमधून कमी किमतीच्या उपकरणांचा वेगाने विस्तार होत असून त्यांना पाश्चात्य उत्पादनांच्या तुलनेत किमतीचा लक्षणीय फायदा आहे, असेही त्यांनी सांगितले. या उत्पादकांनी जागतिक बाजारपेठेत आधीच लक्षणीय हिस्सा मिळवायला सुरुवात केल्याबद्दल त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला.
भारतीय कंपन्यांकडे सीजीएम सह इतर समान दर्जाची उपकरणे विकसित करण्याची तांत्रिक क्षमता असल्याचे निरीक्षण डॉ. जितेंद्र सिंह यांनी नोंदवले. मात्र, उत्पादन वाढवण्यासाठी उद्योगाचा अधिक मजबूत सहभाग आणि लक्ष्यित सहाय्य आवश्यक असेल, हे त्यांनी स्पष्ट केले. किफायतशीर मॉनिटरिंग तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.
क्लिनिकल ट्रायल्स, तंत्रज्ञान विकास आणि वित्तपुरवठा मॉडेल यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय संशोधक, उद्योग क्षेत्रातील भागधारक आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांचा समावेश असलेल्या अधिक सखोल सहकार्याच्या संभाव्यतेवर दोन्ही बाजूंनी चर्चा केली.
डॉ. पाल यांच्या जुलैमध्ये होणाऱ्या प्रस्तावित भारत दौऱ्यादरम्यान संबंधित घटकांना एकत्र आणण्यासाठी तसेच उत्पादन आणि जागतिक स्तरावर पोहोच वाढवण्याचे मार्ग शोधण्यासाठी एक हितधारक बैठक आयोजित करावी, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सुचवले.
मधुमेहाचा वाढता भार हाताळताना भारताचा जैव-उत्पादन पाया मजबूत करण्यावर असलेल्या व्यापक धोरणात्मक भर या देवाणघेवाणीतून दिसून येतो. मर्यादित जागतिक पुरवठादार, वाढती मागणी आणि परवडण्यातील सातत्यपूर्ण आव्हाने लक्षात घेता, बायोसिमिलर इन्सुलिन आणि स्वदेशी वैद्यकीय उपकरणांवर लक्ष केंद्रित केल्याने, अत्यावश्यक उपचारांच्या समान उपलब्धतेबाबतच्या विकसित होत असलेल्या जागतिक चर्चेत भारताला एक महत्त्वाचे स्थान मिळते.
या चर्चेत भारताच्या जैव-उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्याबरोबरच वाढत्या मधुमेहाच्या समस्येला सामोरे जाण्याच्या व्यापक धोरणात्मक भराचा प्रत्यय येतो. जागतिक स्तरावर मर्यादित पुरवठादार, वाढती मागणी आणि परवडणाऱ्या किमतीसंदर्भातील सातत्यपूर्ण आव्हाने लक्षात घेता, बायोसिमिलर इन्सुलिन आणि स्वदेशी वैद्यकीय उपकरणांवर लक्ष केंद्रित केल्याने आवश्यक उपचार सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या जागतिक चर्चेत भारताचे स्थान अधिक मजबूत होत आहे.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249061)
अभ्यागत कक्ष : 16