संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस 'शची'चे जलावतरण आणि आयसीजीएस 'अचल' सुपूर्द करून गोवा शिपयार्डने गाठला दुहेरी मैलाचा टप्पा

Posted On: 31 MAR 2026 6:09PM by PIB Mumbai

 

जीएसएल म्हणजेच गोवा शिपयार्ड लिमिटेडने आज भारतीय नौदलासाठी 'नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल व्हेसल' (एनजीओपीव्ही) श्रेणीतील आयएनएस 'शची' (यार्ड 1280) चे औपचारिक जलावतरण केले, तसेच भारतीय तटरक्षक दलाकडे आयसीजीएस  'अचल' (यार्ड 1274) सुपूर्द करून एक महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवली.

नौदलाच्या एनजीओपीव्ही कार्यक्रमाचा भाग असलेली आयएनएस 'शची'  या युद्धनौकेचे  जलावतरण शगुन सोबती, नौदल उपप्रमुख व्हाइस ॲडमिरल तरुण,  तटरक्षक दलाचे डीआयजी व्ही. के. परमार आणि नौदलाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘शची’ चे जलावतरण म्हणजे देशांतर्गत नौदल क्षमता बळकट करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. त्याच वेळी, आयसीजीएस 'अचल' ही नौका भारतीय तटरक्षक दलाच्या स्वाधीन करण्यात आली. ‘अचल’ मुळे किनारपट्टीवर पाळत ठेवणे शक्य होणार आहे आणि सागरी सुरक्षा अधिक बळकट होणार आहे.

‘जीएसएल’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांनी नमूद केले की हे दुहेरी यश जीएसएलची उत्तम अंमलबजावणी क्षमता आणि वाढती उत्पादन क्षमता दर्शवते. या शिपयार्डने गेल्या 600  दिवसांत 14 नौकांचे जलावतरण केले आहे असे सांगून  उपाध्‍याय म्हणाले की यावरून आपल्या संस्थेची जहाज  बांधणीची  वेगवान वाटचाल   दिसून येते.  या दोन्ही नौकांमध्ये स्वदेशी घटकांच्या वापराचे  प्रमाण लक्षणीय आहे. आयसीजीएस 'अचल' मध्ये 65 टक्क्यांहून अधिक, तर आयएनएस 'शची' मध्ये सुमारे 76 टक्के स्वदेशी सामानाचा वापर करण्‍यात आला आहे. यामुळे  सरकारच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' या उपक्रमांना बळकट करण्यासाठी हातभार लावला गेला आहे. 

दोन्ही जहाजांच्या बांधणीची कामगिरी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील जहाजबांधणी आणि सागरी सामर्थ्यामध्ये एक प्रमुख योगदानकर्ता म्हणून ‘जीएसएल’ ची भूमिका अधिकच अधोरेखित करते.

***

माधुरी पांगे/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2247346) अभ्यागत कक्ष : 44
Read this releasein: English