सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्धा येथे ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत कारागिरांना यंत्रसामग्री आणि साधन संचांचे वितरण


विकसित भारत@2047 हे उद्दिष्ट साकारण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग महत्त्वाचे: केव्हीआयसी अध्यक्ष मनोज कुमार

Posted On: 29 MAR 2026 5:52PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील,  खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने ( केव्हीआयसी) शनिवार (28 मार्च 2026) रोजी विदर्भातील वर्धा येथील गोपुरी येथील ग्राम सेवा मंडळ परिसरात ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत यंत्रसामग्री, साधन संचांचे आणि प्रमाणपत्रांचे वितरण कार्यक्रम आयोजित केला.

केव्हीआयसीचे अध्यक्ष मनोज कुमार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी यावेळी विविध ग्रामोद्योग उपक्रमांमध्ये कार्यरत 340 कारागिरांना 848 आधुनिक यंत्रसामग्री आणि  साधन संच वितरित केले. ग्रामीण कौशल्यांना शाश्वत उद्योजकतेत रूपांतरित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले. तसेच विविध कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 200 हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली.

वितरित करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये कुंभार सशक्तीकरण योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक मातीचे चाक, मध अभियान अंतर्गत मध पेट्या, लाकडी कलाकुसरीसाठी यंत्रे, पेपर प्लेट्स आणि द्रोण बनविण्याची यंत्रे तसेच विद्युत कामगार आणि प्लंबरसाठी साहित्य संच यांचा यात समावेश होता. यामुळे पारंपरिक उद्योगांसह ग्रामीण सेवा क्षेत्रालाही बळकटी मिळणार आहे.

कार्यक्रमाला संबोधित करताना मनोज कुमार यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘विकसित भारत@2047’ ही संकल्पना महात्मा गांधींच्या स्वदेशी, ग्राम स्वराज्य आणि आत्मनिर्भरतेच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि खादी व ग्रामोद्योगाची ह्या संकल्पपूर्तीत महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यांनी ग्राम सेवा मंडळ परिसरातील मध्यवर्ती ऑर्गनिक सिल्वर प्लांट प्रकल्पालाही भेट दिली आणि अशा नवकल्पनांमुळे खादीची गुणवत्ता, उत्पादकता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढेल, असे नमूद केले.

विदर्भात केव्हीआयसीच्या प्रयत्नांमुळे, गेल्या पाच वर्षांत ग्रामोद्योग विकास योजनेअंतर्गत 4,196 पेक्षा अधिक साधन संच आणि यंत्रे वितरित करण्यात आली असून सुमारे 1,820 व्यक्तींना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे आणि शाश्वत उपजीविकेला चालना मिळाली आहे, असेही मनोज कुमार यांनी सांगितले.

केव्हीआयसीच्या नागपूर विभागीय कार्यालयाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अंतर्गत लक्षणीय प्रगती साधली आहे. मागील पाच वर्षांत रुपये 109 कोटींपेक्षा जास्त अंश भांडवल सहाय्याद्वारे 4,250 केंद्र स्थापन करण्यात आली असून 25,589 पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली.

खादी क्षेत्रातही नागपूर विभागाने उल्लेखनीय वाढ नोंदवली असून सध्या 13 खादी संस्थांशी सुमारे 3,997 कारागीर संलग्न आहेत. याच कालावधीत खादी उत्पादन रु. 19.48 कोटीपर्यंत पोहोचले, तर विक्री रु. 54.40 कोटींपेक्षा अधिक झाली आहे, ज्यामुळे वाढती मागणी आणि बाजार विस्तार दिसून येतो.

या कार्यक्रमाला खादी संस्थांचे प्रतिनिधी, कारागीर, प्रशिक्षणार्थी, बँक अधिकारी तसेच केव्हीआयसी आणि राज्य सरकारचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

***

राधिका अघोर/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246674) अभ्यागत कक्ष : 55
Read this releasein: English