दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाद्वारे नवीन 'प्रीमियम' आणि 'कालबद्ध' वितरण सेवांचे प्रदर्शन करण्यासाठी 'ग्राहक मेळाव्या'चे आयोजन

Posted On: 29 MAR 2026 5:02PM by PIB Mumbai

 

टपाल विभागाच्या, महाराष्ट्र परिमंडळाने नव्याने सुरू केलेल्या 'प्रीमियम' आणि 'कालबद्ध' वितरण सेवांच्या संचाचा प्रचार करण्यासाठी 27 मार्च 2026 रोजी एका विशेष 'ग्राहक मेळाव्या'चे आयोजन केले होते. महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात, याच महिन्याच्या सुरुवातीला (17 मार्च रोजी) सुरू करण्यात आलेल्या "24 स्पीड पोस्ट", "24 स्पीड पोस्ट पार्सल" आणि "48 स्पीड पोस्ट" या सेवांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात टपाल सेवा संचालक (मुख्यालय) सिमरन कौर यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. सेवा वितरणात उत्कृष्टता आणण्याच्या टपाल विभागाच्या उद्दिष्ट पूर्तीत ग्राहकांचा सक्रिय सहभाग आणि त्यांचे अभिप्राय हेच मुख्य आधारस्तंभ आहेत, यावर त्यांनी भर दिला

व्यवसाय आणि ई-कॉमर्स क्षेत्रांमध्ये सुरक्षित आणि अति-जलद लॉजिस्टिक्सची वाढती गरज भागवण्याच्या उद्देशानेच या सेवांची रचना करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांनी, या 'प्रीमियम' सेवांमागील दृष्टीकोनाचे सविस्तर स्पष्टीकरण देताना सांगितले.

या विशेष सेवांमध्ये "24 स्पीड पोस्ट"चा समावेश आहे, जी निवडक क्षेत्रांमध्ये 24 तासांच्या आत कागदपत्रांचे वितरण करते; "24 स्पीड पोस्ट पार्सल" ही सेवा 24 तासांच्या आत जलद आणि पार्सल वितरण पूर्ण करते; तर "48 स्पीड पोस्ट" ही सेवा एका विस्तृत नेटवर्कमध्ये 48 तासांच्या आत निश्चित वितरणाची हमी देते. या सगळ्या सेवा जलद आणि विश्वासार्ह आहेत.

 या कालबद्ध सेवांमुळे विशेषत: व्यावसायिक, ई-कॉमर्स क्षेत्रातील भागधारक आणि सरकारी विभागांची सुरक्षित आणि कार्यक्षम लॉजिस्टिक्स उपायांची वाढती मागणी पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमादरम्यान, "24 स्पीड पोस्ट" सेवेअंतर्गत होणाऱ्या वितरणाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच सांस्कृतिक आणि वाद्य-संगीत सादरीकरण आणि 'स्टँड-अप कॉमेडी'चा एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जे. वैशाली यांनी केले.

या कार्यक्रमाला अनेक नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह, वरिष्ठ अधिकारी, मान्यवर ग्राहक, तसेच विविध कंपन्यांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश होता. या प्रसंगी विविध देशांचे महावाणिज्यदूत देखील उपस्थित होते.

***

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246667) अभ्यागत कक्ष : 78
Read this releasein: English