जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीडब्ल्यूपीआरएस पुणेतर्फे जागतिक जल दिन 2026 चे आयोजन; जल व्यवस्थापनात लिंग-निरपेक्ष समावेशकता आणि डिजिटल नवोन्मेषावर तज्ञांचा भर

Posted On: 26 MAR 2026 6:32PM by PIB Mumbai

पुणे, 26 मार्च 2026

 

केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस), पुणे यांनी जागतिक जल दिन 2026 निमित्त आज एका उच्चस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले. संयुक्त राष्ट्रांच्या "जल आणि लिंग-निरपेक्षता: जिथे पाणी वाहते, तिथे समानता वाढते" या संकल्पनेशी सुसंगत असलेला हा कार्यक्रम सीडब्ल्यूपीआरएस सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यशाळेत जलसुरक्षा, लिंग-निरपेक्ष समानता आणि तांत्रिक प्रगती यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंधांवर चर्चा करण्यासाठी आघाडीचे तज्ञ एकत्र आले होते. या कार्यशाळेत भारतासमोरील विशिष्ट जल आव्हाने आणि जल-सुरक्षित भविष्य घडवण्यात वैज्ञानिक संशोधनाच्या भूमिकेवर भर देण्यात आला.

"जलशक्ती हीच राष्ट्रशक्ती आहे" असे सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक डॉ. प्रभात चंद्र यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. जलसंपदा व्यवस्थापनाच्या धोरणात्मक महत्त्वावर त्यांनी भर दिला. भारत जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 18% लोकांना आधार देत असला तरी जगातील गोड्या पाण्याच्या संसाधनांपैकी केवळ 4% संसाधने भारताकडे आहेत, त्यामुळे कार्यक्षम जल व्यवस्थापन हे राष्ट्रीय प्राधान्य आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. चंद्र यांनी जलविज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात महिलांच्या योगदानाची प्रशंसा केली. तसेच, संशोधन क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग आवश्यक असल्याचे ते म्हणाले.  सीडब्ल्यूपीआरएस च्या "व्हिजन 2047" प्रति असलेल्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला. संस्थेला हवामान बदलासाठी सक्षम जल-पायाभूत सुविधा आणि प्रगत धरण आरोग्य मूल्यांकनासाठी जागतिक उत्कृष्टता केंद्र म्हणून स्थापित करणे, हा या दृष्टिकोनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले आयआयटी मुंबईचे प्रा. बसुदेव बिस्वाल यांनी या क्षेत्राच्या तांत्रिक उत्क्रांतीवर, विशेषतः "कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील जलवैज्ञानिक मॉडेलिंगमधील काटकसर" या विषयावर भाष्य केले. भारतात प्रचंड प्रतिभा असली तरी परस्पर संवादासाठी मजबूत अंतर्गत व्यासपीठांची मोठी कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. बिस्वाल यांनी अभियांत्रिकी समुदायाला तांत्रिक कौशल्य आणि धोरण यांमधील दरी कमी करण्याचे आवाहन केले. "अभियंते धोरणनिर्मितीत अपेक्षित प्रमाणात सहभागी होत नाहीत," असे ते म्हणाले. देशाचे तांत्रिक स्वावलंबन वाढवण्यासाठी तसेच जागतिक सेवांमधील व्यत्ययांविरुद्ध सक्षमता टिकवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत टी. धुमाळ यांनी पाणीटंचाई आणि व्यवस्थापनासंदर्भात सखोल क्षेत्रीय माहिती दिली. महाराष्ट्रातील भौगोलिक विषमतेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की राज्यातल्या काही भागांना "एकाच वेळी पूर आणि दुष्काळाचा" सामना करावा लागतो. काही दिवसांच्या प्रभावी पावसावर वर्षभराची पाण्याची गरज अवलंबून असल्याने जलव्यवस्थापन अधिक गुंतागुंतीचे झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वाढते शहरीकरण आणि प्रदूषण यांच्या पार्श्वभूमीवर केवळ पाण्याचे प्रमाणच नव्हे तर शुद्ध पाण्याची उपलब्धता हेच आजचे मोठे आव्हान असल्याचे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.  

या कार्यशाळेत डॉ. प्राजक्ता गाडगे यांचे शाश्वत उपायांवर आणि जाई एदलाबादकर यांचे सर्वसमावेशक धरण सुरक्षा विषयावर तांत्रिक सादरीकरणही झाले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत जतन करण्यात आलेल्या 1954 सालच्या डिजिटल संग्रहित चित्रपटाचे प्रदर्शन, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सीडब्ल्यूपीआरएस भेटीचे दृश्य दाखवण्यात आले. या कार्यक्रमात सीडब्ल्यूपीआरएसच्या कर्मचाऱ्यांनी लिंग-निरपेक्ष समानता आणि पाणी या विषयावर एक नाटिका सादर केली. वैज्ञानिक पी. कुंजीर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245737) अभ्यागत कक्ष : 87
Read this releasein: English