ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीने आयआयटी मुंबईच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांसाठीच्या दुसऱ्या तुकडीसाठी सुरू केला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि यंत्र प्रशिक्षण (एमएल) प्रमाणपत्र अभ्यासक्रम
Posted On:
25 MAR 2026 7:37PM by PIB Mumbai
मुंबई, 25 मार्च 2026
राष्ट्रीय औष्णिक उर्जा महामंडळाच्या मुंबईतील (एनटीपीसी) पश्चिम विभागीय -I मुख्यालयाने भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी) यांच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या तुकडीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि यंत्र प्रशिक्षण (एमएल) प्रमाणपत्र अभ्यासक्रम काल 24 मार्च 2026 रोजी सुरू केला. एनटीपीसीच्या पश्चिम -I चे प्रादेशिक कार्यकारी संचालक ई. सत्य फणी कुमार यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज औपचारिक उद्घाटन झाले. कार्यक्रमाचा कालावधी पाच दिवसांचा आहे.
या कार्यक्रमाचे नेतृत्व पृथ्वी विज्ञान विभाग, आयआयटी मुंबईतील यंत्र बुद्धिमत्ता आणि माहिती विज्ञान केंद्र तसेच औद्योगिक अभियांत्रिकी आणि कार्यप्रणाली संशोधन विभाग करत आहेत. पहिल्या तुकडीने हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या तुकडीत एनटीपीसी प्रकल्प आणि केंद्रांमधून देशभरातील 30 जण सहभागी झाले आहेत. यामुळे एनटीपीसीची उदयोन्मुख तंत्रज्ञानातील क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नांना बळ मिळत आहे.

प्रादेशिक मानव संसाधन प्रमुख (पश्चिम-I) वंदना चतुर्वेदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. विशेषतः ऊर्जा आणि वीज क्षेत्रातील वापरासाठी एनटीपीसीची कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रविषयक कौशल्ये वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
पाच दिवसांच्या या अभ्यासक्रमात डेटा प्रक्रिया, पर्यवेक्षित आणि अपर्यवेक्षित शिक्षण, पुर्वानुमानीत देखभाल, टाइम सीरीज अंदाज, डीप लर्निंग आणि ऊर्जा प्रणालींमध्ये जनरेटिव्ह एआयचा वापर यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम सहभागीना प्रत्यक्ष उद्योगाशी संबंधित कौशल्ये देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. त्याचा वापर वीज क्षेत्रातील कार्यवाही आणि धोरणात्मक कामांमध्ये थेट करता येईल. बदलत्या ऊर्जा क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान स्वीकारण्याचे महत्त्व ई. सत्य फणी कुमार यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्र शिक्षणातील कौशल्ये वाढवणे हे कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि एनटीपीसीला शाश्वत व तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे नेण्यासाठी आवश्यक असल्याचे वंदना चतुर्वेदी यांनी नमूद केले. मोठ्या ऊर्जा प्रणालींमध्ये नवे तंत्रज्ञान आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर यातली तफावत भरून काढण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्व प्रा. विक्रम विशाल यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे एनटीपीसी आणि आयआयटी मुंबई यांच्यातील सहकार्य अधिक दृढ झाले आहे आणि कर्मचारी प्रशिक्षणाद्वारे प्रगत तंत्रज्ञान ऊर्जा क्षेत्रात आणण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2245371)
अभ्यागत कक्ष : 38