वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय मानक ब्युरो मुंबई द्वारे 'जागतिक ग्राहक हक्क दिन 2026' निमित्त उद्योग-ग्राहक संवादाचे आयोजन


भारतीय मानक ब्युरोच्या कार्यक्रमाने ग्राहक संरक्षणामधील कायदा,नीतिमत्ता आणि मानकांची भूमिका अधोरेखित केली

Posted On: 18 MAR 2026 8:58PM by PIB Mumbai

मुंबई, 18 मार्च 2026

भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) जागतिक ग्राहक हक्क दिन 2026 निमित्त आज मुंबईत उद्योग-ग्राहक संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बीआयएस च्या मुंबई शाखा कार्यालयाचे सायंटिस्ट-ई आणि प्रमुख, पिनाकी गुप्ता यांनी स्वागतपर भाषण केले आणि ग्राहक जागरूकता आणि मानकीकरणाच्या महत्त्वावर भर देऊन या कार्यक्रमाची सुरुवात केली. बीआयएसचे उपमहासंचालक (पश्चिम विभाग) व्ही. गोपीनाथ यांनी उद्घाटनपर भाषण केले. त्यांनी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यामधील, तसेच उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यामधील  मानकांच्या महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.

कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसेसचे अध्यक्ष स्वप्नील कोठारी यांनी आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठ परिसंस्थेतील नैतिक व्यावसायिक आचरण आणि स्वयंनियमनाच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले की, बीआयएस सारख्या संस्थांनी निश्चित केलेली नियामक चौकट आणि मानके जरी अत्यंत महत्त्वाची असली, तरी ग्राहकांचे खरे संरक्षण हे व्यवसायांच्या प्रामाणिकपणे कामकाज करण्याच्या हेतू पासूनच सुरू होते.

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई येथील शैक्षणिक अधिष्ठाता आणि आयक्यूएसी चे संचालक, प्रा. (डॉ.) अमोल देव चव्हाण यांनी ग्राहक हक्कांच्या संदर्भात कायदेशीर आणि शैक्षणिक दृष्टिकोन मांडला. ग्राहक संरक्षण चौकटीसह, विविध कायदे नागरिकांना दाद मागण्यासाठी आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी कसे सक्षम करतात, यावर त्यांनी चर्चा केली.

तांत्रिक सत्रांमध्ये उद्योग आणि ग्राहकांशी संबंधित प्रमुख मुद्यांचा समावेश होता. बीआयएसचे  अनुराग यांनी “बीआयएस प्रमाणनामुळे व्यवसाय सुलभता वाढते” या विषयावर सादरीकरण केले, यात प्रमाणन प्रणाली गुणवत्ता हमी आणि बाजारपेठ प्रवेशाला कसे साहाय्य करते यावर भर देण्यात आला. त्यानंतर बीआयएसचे सायंटिस्ट-डी आशिष वाकळे यांनी "हॉलमार्किंगमधील अलीकडील घडामोडी" आणि बीआयएसचे सायंटिस्ट-डी शिवम अग्रवाल यांनी "मानकीकरणाचे भविष्य" या विषयावर सत्रे घेतली.

या कार्यक्रमात उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि ग्राहक संघटना यासारख्या भागधारकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यामुळे ग्राहक सक्षमीकरण आणि गुणवत्ता जागरूकतेप्रति  सामायिक वचनबद्धता दृढ झाली.


निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2242199) अभ्यागत कक्ष : 21
Read this releasein: English