ग्रामीण विकास मंत्रालय
ग्रामीण अनुभव कार्यक्रमामुळे आयआयएम नागपूरच्या विद्यार्थ्यांना तळागाळातील आव्हाने समजून घेण्यास आणि त्यावर उपाय सुचवण्यास मदत
Posted On:
18 MAR 2026 8:08PM by PIB Mumbai
नागपूर, 18 मार्च 2026
ग्रामीण उपजीविका आणि सामुदायिक जीवनाच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना आयुष्यभर स्मरणात राहतील असे मोलाचे अनुभव घेण्याची संधी मिळते, असे मत नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, वासुमना पंत (आयएएस) यांनी व्यक्त केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूर येथे 17 मार्च 2026 रोजी झालेल्या 'भारत दर्शन' ग्रामीण अनुभव कार्यक्रमाच्या समारोप समारंभात त्या बोलत होत्या. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञानाच्या पलीकडे जाऊन भारतातील वास्तव परिस्थितीचे खोलवर आकलन करून घेता येते, तसेच भावी नेते म्हणून त्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो. जबाबदार आणि संवेदनशील व्यवस्थापन व्यावसायिकांना घडवणाऱ्या या सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण उपक्रमाची संकल्पना तयार करून तिची अंमलबजावणी करत असल्याबद्दल त्यांनी आयआयएम नागपूरचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमांतर्गत,300 हून अधिक विद्यार्थ्यांनी नागपूर परिसरातील विविध ग्रामीण संस्था,शेतकरी-उत्पादक गट, बचत गट, शैक्षणिक संस्था आणि शाश्वतता-चलित उद्योगांना भेटी दिल्या. आठ गटांमध्ये विभागलेल्या विद्यार्थ्यांनी उत्पादन प्रक्रिया, बाजारपेठेतील पद्धती, खर्चाची रचना आणि विकासाच्या संधी यांचा अभ्यास करण्यासाठी 31 जानेवारी रोजी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. त्यांनी नंतर प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांचे विश्लेषण केले आणि 28 फेब्रुवारी रोजी संबंधित संस्थांना संरचनात्मक आखणी केलेल्या, उपाय-केंद्रित शिफारशी सादर केल्या. हे निष्कर्ष आणि सूचना 17 मार्च रोजी समारोप सत्रात प्राध्यापक आणि तज्ञांसमोर पुन्हा सादर करण्यात आल्या. या सादरीकरणांमध्ये व्यवसाय विकास, ब्रँड वृद्धी, बाजारपेठेचा विस्तार आणि साधन संपत्तीचा पुरेपूर वापर यासंबंधीच्या व्यावहारिक सूचनांचा समावेश होता, यापैकी अनेक सूचनांची अंमलबजावणी करण्यात स्थानिक संस्थांनी स्वारस्य दर्शविले.

आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री यांनी, अशा प्रकारचे उपक्रम व्यावहारिक व्यवस्थापन शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले. “या प्रक्रियेच्या माध्यमातून विद्यार्थी लवकर शिकतात. वर्गांत घेतल्या गेलेल्या अनेक सत्रांपेक्षा एक अर्थपूर्ण क्षेत्रभेट देखील अनेकदा अधिक आकर्षक आणि प्रभावी ठरू शकते. हा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे नेतृत्व आणि सामाजिक जाणीवेच्या दीर्घ प्रवासातील पहिले पाऊल आहे,” असे ते म्हणाले.
प्रा.प्रकाश अवस्थी यांनी विद्यार्थ्यांच्या दर्जेदार सादरीकरणाचे कौतुक करत येत्या काही वर्षांत हा उपक्रम अधिक व्यापक आणि प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी त्यांच्या अध्ययन अनुभवाचा भाग म्हणून विविध संस्था आणि उपक्रमांना भेटी दिल्या. तसेच हिंगणा आणि वाघधारा भागातील स्वयं-सहाय्यता गटांच्या उपक्रमांमध्येही ते सहभागी झाले.

शैलेश पाटील/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242117)
अभ्यागत कक्ष : 79