आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
नागपूर येथे ‘ऑपरेशनल फ्रेमवर्क्स फॉर वन हेल्थ : नॅशनल व्हिजन अँड स्टेट ॲक्शन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा
राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा आणि महामारीसारख्या आपत्तीच्या सज्जतेसाठी ‘वन हेल्थ’ही गुरुकिल्ली : मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय सूद
प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणाऱ्या (झूनोटिक) रोगांचा सामना करण्यासाठी समन्वित दृष्टिकोन अत्यावश्यक :आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ.राजीव बहल
Posted On:
18 MAR 2026 6:56PM by PIB Mumbai
नागपूर, 18 मार्च 2026
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ‘आरोग्य संशोधन विभागाने’ (डीएचआर ) स्थापन केलेल्या नागपूरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वन हेल्थ’ (एनआयओएच) यांनी; भुवनेश्वरच्या आयसीएमआर – आरएमआरसी’ च्या सहकार्याने नुकतीच दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेचा विषय ‘ऑपरेशनल फ्रेमवर्क्स फॉर वन हेल्थ : नॅशनल व्हिजन अँड स्टेट ॲक्शन’ असा होता. ‘वन हेल्थ’ हे राष्ट्रीय अभियान प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी येणाऱ्या धोरणात्मक रणनीतींमध्ये परिवर्तन करणे आणि राज्य तसेच स्थानिक स्तरावर या धोरणांची समन्वित अंमलबजावणी सुनिश्चित करणे, हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.

कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात, देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय सूद यांचे दूरदृश्य माध्यमातून मुख्य भाषण झाले. याप्रसंगी,केंद्राच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे’चे (आयसीएमआर) महासंचालक डॉ.राजीव बहल यांनीही आभासी माध्यमातून विशेष मार्गदर्शन केले. तसेच, नवी दिल्ली येथील ‘पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागा’च्या (डीएएचडी) पशुसंवर्धन आयुक्त डॉ. नवीना बी. महेश्वरप्पा यांनीही आभासी माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आपले मुख्य भाषण देताना, प्रा. अजय सूद यांनी ‘एकात्मिक देखरेखी’च्या निकडीवर विशेष भर दिला. ते म्हणाले: “वन हेल्थ’ ही केवळ एक संकल्पना नसून, ती आपल्या राष्ट्रीय आरोग्य सुरक्षेचा आणि भविष्यात जर महामारी आली तर त्यावर उपाय योजना म्हणून तयारीचा पाया असणार आहे. धोरण, विज्ञान आणि प्रशासन यांचा प्रभावी समन्वय कसा साधता येतो, याचे उत्तम ‘मॉडेल’ बनण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. मानवी आरोग्याची देखरेख, पशुधनातील रोगांची नोंदणी, वन्यजीवांचे निरीक्षण आणि पर्यावरणीय माहिती संकलन—या सर्व बाबींनी केवळ स्वतंत्र, समांतर यंत्रणा म्हणून काम न करता, त्या परस्परांशी सुसंगत आणि जोडलेल्या असणे आवश्यक आहे. विविध विभागांमध्ये माहितीचा अखंडित प्रवाह सुरू राहिला तरच , आपल्याला संभाव्य धोक्यांची ‘पूर्वसूचना’ मिळवणे शक्य होईल.”

याप्रसंगी आभासी माध्यमातून बोलताना, डॉ. राजीव बहल यांनी या अभियानाच्या रचनेवर आणि महामारीचा सामना करण्याच्या तयारीमध्ये ‘आंतर-क्षेत्रीय समन्वया’ला किती महत्त्व आहे, यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “राष्ट्रीय एक आरोग्य अभियान हे प्राणीजन्य धोक्यांचा सामना करण्यासाठी आणि वैद्यकीय उपाययोजना मजबूत करण्यासाठीच्या सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. आपली पर्यावरणीय विविधता आणि मानव-प्राणी यांच्यातील घनिष्ठ संबंधांमुळे आरोग्यासंबंधी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी नवीन धोके उद्भवू शकतात. वैज्ञानिक संस्था, सरकारी विभाग आणि तांत्रिक भागीदार यांच्या समन्वयातून या धोक्यांचे व्यवस्थापन करण्याची आपली क्षमता बळकट करणे, हा राष्ट्रीय आरोग्य सुरक्षेचा एक अत्यावश्यक आधारस्तंभ आहे.” त्यांनी पुढे राज्य आणि जिल्हा स्तरावरील साथीच्या रोगांना प्रतिसाद देणाऱ्या पथकांच्या गरजेवर भर दिला.
या दोन दिवसीय कार्यशाळेत प्राणीजन्य रोग आणि त्यांच्या प्रसारामुळे निर्माण होणारी धोकादायक गुंतागुंत याचाही आढावा घेण्यात आला. पहिल्या दिवशी 'वन हेल्थ' दृष्टिकोन कार्यान्वित करण्यावर लक्ष केंद्रित करणारी तांत्रिक सत्रे आणि गट चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. दुस-या दिवशी जैविक धोक्यांसाठीची पूर्वतयारी, वैद्यकीय उपाययोजनांचा विकास आणि वन्यजीवांशी संबंधित साथीच्या रोगांचा तपास यावरील विषयांवर भर देण्यात आला.
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2242050)
अभ्यागत कक्ष : 108