दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
निश्चित कालमर्यादेत सेवा वितरणाला चालना देण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट,24 स्पीड पोस्ट पार्सल आणि 48 स्पीड पोस्ट या प्रीमिअर सेवांचा केला आरंभ
Posted On:
17 MAR 2026 9:29PM by PIB Mumbai
मुंबई, 17 मार्च 2026
केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाच्या टपाल विभागाने आज राष्ट्रीय स्तरावर '24 स्पीड पोस्ट', '24 स्पीड पोस्ट पार्सल' आणि '48 स्पीड पोस्ट' या तीन नवीन 'प्रीमियम वितरण सेवा' सुरू केल्या. वेगाने विस्तारणाऱ्या 'एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स' च्या काळात निर्धारित वेळेत सेवा वितरण करण्यासाठी भारतीय टपाल विभागाची क्षमता वृद्धिंगत करणे या सेवांचा मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माननीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी, सचिव (टपाल) वंदिता कौल, टपाल सेवा महासंचालक जितेंद्र गुप्ता आणि सदस्य (संचालन) हरप्रीत सिंग यांच्या उपस्थितीत या सेवांचे अनावरण करण्यात आले.
या विशेष प्रीमिअर सेवा सुरुवातीला सहा मेट्रो शहरांमध्ये कार्यान्वित केल्या जाणार असून त्यानंतर या सेवा सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने त्यांचा विस्तार श्रेणी एक आणि श्रेणी दोन शहरांमध्ये केला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सहा महानगरे आभासी पद्धतीने जोडली गेली होती.
भारतीय टपाल विभागाकडे व्यापकता आणि विश्वास अशा दोन अद्वितीय वैशिष्ट्यांचा संगम आहे ज्याची बरोबरी जागतिक स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांनाही करणे शक्य नाही असे ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सांगितले. या नवीन सेवांमध्ये विशेष प्रक्रिया यंत्रणा आणि हवाई वाहतुकीला प्राधान्य देणाऱ्या व्यवस्थांचा वापर केला जाईल; ज्यामुळे प्रमुख महानगरे आणि महत्त्वाच्या व्यावसायिक केंद्रांदरम्यान अधिक वेगवान संपर्क सुनिश्चित होईल, असेही ते म्हणाले.
व्यवसाय, वित्तीय संस्था, सरकारी संस्था आणि वैयक्तिक ग्राहकांसाठी जलद, सुरक्षित आणि हमीपूर्ण वितरण सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. हा उपक्रम भारतीय टपाल विभागाच्या लॉजिस्टिक्स जाळ्याचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि देशभरातील ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
नवीन सेवांची प्रमुख वैशिष्ट्ये:
I) 24 स्पीड पोस्ट (D+1 वितरण):
सहा प्रमुख महानगरांदरम्यान (मेट्रो शहरांदरम्यान) — नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद — दुसऱ्या दिवशी वितरणाची हमी
वितरणासाठी निश्चित कालमर्यादा आणि विलंब झाल्यास नुकसानभरपाई
प्रत्यक्ष वेळेतील मागोवा आणि OTP-आधारित वितरण पुष्टीकरण
रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशीही वितरणाची सुविधा उपलब्ध (प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि गांधी जयंती वगळता)
II) 48 स्पीड पोस्ट (D+2 वितरण):
त्याच महानगरांमध्ये दोन दिवसांच्या आत वितरणाची खात्री
सुरुवातीपासून शेवटपर्यंत ट्रॅकिंग, एस एम एस च्या माध्यमातून सूचना आणि वितरणाची सुरक्षित खात्री
वेळेच्या मर्यादेत कागदपत्रांचे वितरण करण्यासाठी एक विश्वसनीय पर्याय
III) 24 स्पीड पोस्ट पार्सल:
वेळेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पार्सल्ससाठी दुसऱ्याच दिवशी वितरण
निश्चित कालमर्यादांची हमी; विलंबाच्या प्रसंगी नुकसानभरपाईची तरतूद
रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशीही वितरण उपलब्ध (राष्ट्रीय सुट्ट्या वगळून)
विशेषत: ई-कॉमर्स कंपन्या, एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससाठी फायदेशीर आहे.
या प्रसंगी, महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांनी, या सेवांच्या शुभारंभाच्या स्मरणार्थ एक 'विशेष टपाल शिक्का' (Special Cancellation) प्रकाशित केला.
या कार्यक्रमाला मुंबई विभागाच्या पोस्टमास्तर जनरल काया अरोरा, टपाल सेवा संचालक (मुख्यालय) सिमरन कौर आणि मुंबई जीपीओच्या संचालक रेखा रिझवी, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि ग्राहक उपस्थित होते.

या विशेष कॅन्सलेशनच्या (टपाल शिक्का) प्रकाशनानंतर पत्रकार, प्रसारमाध्यमे आणि आमंत्रित ग्राहकांबरोबर संवादात्मक सत्र आयोजित करण्यात आले.
या प्रीमियम सेवांचा शुभारंभ, टपाल विभागाची नाविन्य, कार्यक्षमता आणि ग्राहक-केंद्रित सेवा वितरणाप्रति वचनबद्धता दर्शवतो. या सेवांच्या माध्यमातून, भारतीय टपाल विभाग प्रीमियम एक्सप्रेस डिलिव्हरी क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत करत असून, देशभरातील व्यवसाय आणि नागरिकांना आधार देणारा एक विश्वासार्ह राष्ट्रीय लॉजिस्टिक्स भागीदार म्हणून अविरत सेवा देत आहे.
निलीमा चितळे/राजश्री आगाशे/भक्ती सोनटक्के /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2241508)
अभ्यागत कक्ष : 35