कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लिंबूवर्गीय फळांची शेती करणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा आयसीएआर-सीसीआरआय, नागपूर इथे विचारमंथन कार्यशाळेत सहभाग

Posted On: 16 MAR 2026 6:47PM by PIB Mumbai

नागपूर, 16 मार्च 2026

 

लिंबूवर्गीय फळांवर आधारित कृषी-अन्न व्यवस्थांमध्ये असलेली लिंगभेदातील तफावत लक्षात घेण्यासाठी “विचारमंथन कार्यशाळा” आयसीएआर-सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (सीसीआरआय), नागपूर इथे नुकतीच पार पडली. संस्थेच्या प्रशिक्षण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत सुमारे 30 महिला आणि पुरुष लिंबूवर्गीय फळांचे उत्पादक आणि रोपवाटिका उद्योजक सहभागी झाले होते. लिंबूवर्गीय फळांवर आधारित कृषी-अन्न व्यवस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन आयसीएआर-सीसीआरआय, नागपूरचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी केले. त्यांनी महिला लिंबूवर्गीय उत्पादकांचे स्वागत केले आणि त्यांना वैज्ञानिक पद्धतीने लिंबूवर्गीय शेतीतील प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी गट आणि शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करण्याची प्रेरणा दिली.

कार्यक्रमादरम्यान “निंबुवर्गीय फल आधारित कृषि-खाद्य प्रणाली में संग्लग्न महिलाओं के लिए केंद्र सरकार की कल्याणकारी योजनाओं का संकलन” या शीर्षकाचे हिंदी विस्तारीत वार्तापत्र (क्रमांक 77) प्रकाशित करून त्याच्या प्रती सहभागींना दिल्या.

प्रगती गोखले, मुख्य समन्वयक, मार्केट मिरची आणि भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या निवृत्त प्रधान वैज्ञानिक या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी मार्केट मिरची मोबाईल अनुप्रयोगाच्या वापरावर प्रात्यक्षिक प्रशिक्षण सत्र घेतले. तसेच महिला लिंबूवर्गीय उत्पादक व रोपवाटिका उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

आयसीएआर-सीसीआरआयच्या कृषी विस्तार विभागातील शास्त्रज्ञ डॉ. संगीता भट्टाचार्य यांनी या कार्यशाळेचे समन्वयन केले. विचारमंथन सत्रादरम्यान सहभागींनी लिंबूवर्गीय शेतीतील प्रमुख लिंगभेदात्मक तफावतांवर चर्चा केली. यामध्ये कलम बांधणी पद्धतींबाबत मर्यादित ज्ञान, विपणनातील अडचणी, शासकीय योजनांपर्यंत पोहोचण्यातील अडथळे आणि आर्थिक निर्णयप्रक्रियेत कमी सहभाग यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता. महिला शेतकरी आणि उद्योजकांना सहाय्य करणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाची सांगता शेत व रोपवाटिकेला भेट देऊन झाली. या भेटीत सहभागींनी आयसीएआर-सीसीआरआयने विकसित केलेल्या रोगमुक्त लागवड साहित्य तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहिले.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2240895) अभ्यागत कक्ष : 54
Read this releasein: English